मुंबई : भारतीय जनता पक्षाने विधानसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे या तीन बड्या नेत्यांची नावं नाहीत. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान भाजपने केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली आहे तर गोपीचंद पडळकर बारामतीतून लढणार आहेत.


दरम्यान दुसऱ्या यादीत एकूण 14 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत 125 जणांना उमेदवारी जाहीर केली होती. दोन्ही याद्या मिळून भाजपकडून आतापर्यंत 139 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार भारतीय जनता पक्ष राज्यात 146 जागा लढवणार आहे. तर आता केवळ 7 जागा जाहीर करणं बाकी आहे. त्यामुळे तिसऱ्या यादीत तरी खडसे, तावडे, बावनकुळे यांची नावं असणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

खडसेंकडून मुलीसाठी तिकीटाची मागणी

एकनाथ खडसे यांनी माझाशी बोलताना सांगितले की, मुलीसाठी मी पक्षाकडे तिकीट मागितलं आहे.

खडसे यांची उमेदवारी पक्षाने रखडवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसे यांना फोन करुन राष्ट्रवादीत येण्याचं आवाहन केलं आहे, अशा अफवा पसरू लागल्या आहेत. याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, या सर्व चर्चा खोट्या आहेत. मुळात मला शरद पवारांकडून फोन येण्याचं कारण नाही.

भाजपच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार

1. मोहन सुर्यवंशी – साक्री
2. प्रतापदादा अडसाद – धामणगाव रेल्वे
3. रमेश मावस्कर – मेळघाट
4. गोपाळदास अग्रवाल – गोंदिया
5. अमरिश अत्राम – अहेरी
6. निलय नाईक – पुसद
7. नामदेव ससाणे – उमरेड
8. दिलीप बोरसे – बागलन
9. कुमार उत्तमचंद ऐलानी – उल्हासनगर
10. गोपीचंद पडळकर – बारामती
11. संजय भेगडे – मावळ
12. नमिता मुंदडा – केज
13. शैलेश लाहोटी – लातूर (शहर)
14. अनिल कांबळे – उदगीर