मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या तयारीसाठी  महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतींच्या बैठका सुरू झाल्या आहेत. महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लोकसभा निवडणुकीला जागा वाटपात झालेला गोंधळ लक्षात ठेवून तिन्ही पक्ष विधानसभेला चांगले यश कसे मिळेल या दृष्टिकोनातून अधिकाधिक जागा मिळवण्याच्या  तयारीत आहे. राज्यात लोकसभेत मिळालेले यश विधानसभेतसुद्धा मिळावं आणि चांगला समन्वय राहावा यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपल्या ताकद असलेल्या जागांचा अभ्यास करून  त्या जागांची तयारी करतंय. जागा वाटपावर अद्याप कुठलाच निर्णय झालेला नसताना जागांची तयारी आणि जागांचे दावे हे प्रत्येक पक्षाकडून  केले जात असल्याचा पाहायला मिळतंय.


जागावाटप संदर्भात अजूनही कुठलाही निर्णय झालेला नसताना विधानसभा निवडणुकीच्या आधी  महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष कशाप्रकारे आपली रणनीती ठरवतंय, कोण किती जागांवर तयारी करतोय? कोण किती जागांवर दावा सांगतोय हे पाहूयात. 


महायुतीत शिंदे गटाचा शंभर जागांवर दावा


लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही पक्षांना हव्या तशा जागा जिंकता आलेल्या नाहीत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 15 पैकी सात जागा जिंकून सर्वाधिक स्ट्राइक रेट दाखवून दिला होता. तोच स्ट्राईक रेट किंबहुना याहीपेक्षा जास्तीचा स्ट्राइक रेट आता विधानसभेच्या निवडणुकीत दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांनी कंबर कसली आहे. 


विधानसभेसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला अजून ठरलेला नसला तरीदेखील शिवसेनेच्या सर्वच पारंपरिक जागांसह किमान 100 जागांवर सध्या तयारी सुरू करण्यात आली आहे. या शंभर जागांवर प्रत्येकी एक निरीक्षक नेमला जाण्याची शक्यता आहे. आज देखील वर्षा बंगल्यावर शिवसेना पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. शिंदेंच्या शिवसेनेचा मुख्य मुकाबला हा ठाकरेंच्या शिवसेनेचे असल्यामुळे विधानसभेसाठीची रणनीती आणि संपर्क अभियान ठरवण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.


महायुतीत भाजपने 170 ते 180 जागा लढाव्यात, स्थानिक भाजप नेत्यांचा आग्रह


महाराष्ट्र प्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विधानसभेसाठी 100 जागांची मागणी भाजपकडे केली होती. मात्र शिंदे गटाची ही मागणी मान्य केली तर 2019 पेक्षा कमी जागा भाजपला लढाव्या लागतील. त्यामुळे 170 ते 180 जागांपेक्षा कमी जागांवर भाजपने लढू नये असा आग्रह स्थानिक भाजप नेत्यांनी धरल्याची माहिती आहे. 


जेवढ्या जास्त जागा लढू तेवढा आधिक फायदा होईल असे मत भाजपच्या नेत्यांचे आहे. पुण्यात होणाऱ्या एक दिवसीय संमेलनाच्या आधी भाजप विधानसभेच्या किती जागा लढेल हे निश्चित होईल.


अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हव्यात 85च्या जवळपास जागा  


अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये 85 जागा लढवू इच्छित आहे. 2019 च्या निवडणुकीत 54 आमदार आपले निवडून आले होते. त्यामुळे 54 प्लस जागा आम्ही घेऊ, या जवळपास 85 पर्यंत असू शकतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला आहे. 


काँग्रेस 100 हून अधिक जागांसाठी आग्रही


आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढणार आहे. त्यामध्ये काँग्रेस 100 हून अधिक जागांसाठी आग्रही आहे. किती जागा लढायच्या या संदर्भामध्ये शुक्रवारी कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यासाठी दिल्लीतून केसी वेणू गोपाल आणि  प्रभारी रमेश चन्नीथला हे सुद्धा उपस्थित असणार आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गट असल्यामुळे कोणत्या जागा वाट्याला येतील आणि कोणत्या जागांवर तडजोड करायला लागेल याची खात्री नाही. त्यामुळे सध्या तरी सर्वच जागांची चाचणीपणी काँग्रेसकडून केली जाते. 


यासाठी प्रत्येक मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांकडून अर्जही मागविण्यात आलेले आहेत. काँग्रेसकडून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या जास्तीत जास्त जागांवरती दावा केला जाणार आहे. मुंबईमध्येही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसची रणनीती आहे. 


काँग्रेसच्या ज्या पारंपरिक जागा आहे त्या काहीही झालं तरी न सोडण्याच्या भूमिकेत काँग्रेस आहे. अशा प्रकारची चर्चा दिल्लीत झालेल्या बैठकीतही करण्यात आलेली होती. त्याच अनुषंगाने उद्याच्या बैठकीत यावर संपूर्णपणे चर्चा होईल आणि त्यानंतर किती जागा आणि कशा  लढवायच्या यावरती निर्णय होईल.


महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट 120 ते 130 जागा लढवण्याच्या तयारीत 


महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्रात आपली ताकद असलेल्या 120 ते 130 जागांवर  तयारी करत आहे. मुख्यत्वेकरून मुंबई, मराठवाडा, कोकण  यातील विधानसभा  मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट आपल्या पारड्यात टाकण्यासाठी आग्रही असेल. 


महाविकास आघाडीमध्ये समसमान वाटप झाल्यास  आपले बालेकिल्ले असलेल्या आणि आपली ताकद असलेल्या, 2019 च्या निवडणुकीत निवडून आलेल्या आणि 2024 लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा क्षेत्रात लीड मिळाले आहेत अशा 90 ते 100 जागा या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीत  लढवल्या जाऊ शकतात. लोकसभेप्रमाणे विधानसभेतसुद्धा मुंबईतील अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी ठाकरे गट आग्रही आहे. त्यामध्ये 36 पैकी 25 जागांची तयारी ठाकरे गट करत आहे 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 85 ते 100 जागा लढवण्याच्या तयारीत 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत आपल्याला शंभर जागा मिळाव्यात अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. जास्तीत जास्त 100 आणि कमीत कमी 85 जागा आपण लढणारच अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.


ही बातमी वाचा: