मुंबई : कोरोनामुळे राज्यासह देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यामुळे महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  महाविद्यालयं आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत. तर, यासोबतच कृषी महाविद्यालयंही आजपासून सुरु होणार आहेत. महाविद्यालयात येण्यासाठी विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं बंधनकारक असणार आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्यासाठीच्या सूचना काल देण्यात आल्यात. दिवाळी काही दिवसांवर आहे. त्यातच पुण्यात बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे आज लगेच पुण्यातील महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता कमी आहे. 


आजपासून राज्यभरातील कॉलेज सुरु होत आहेत मात्र अनेक कॉलेजेसच्या एसओपी जाहीर होत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे.  औरंगाबाद आणि पुणे विद्यापीठानं संबंधित महाविद्यालयांच्या प्रशासनाला आदेश जारी केले आहेत. याशिवाय राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये आजपासून सुरू होणार आहे.  20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकारनं हिरवा कंदील दिला आहे. मात्र पुणे, औरंगाबाद  विद्यापीठ, आणि कृषी विद्यापीठाकडून कालपर्यंत त्यासंदर्भातले आदेश महाविद्यालयांना मिळाले नव्हते. मात्र आज आदेश जारी केल्यानं विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे. 


काय आहेत नियम? 



  • कोरोना संसर्ग कमी झालेल्या ठिकाणी 50 टक्केपेक्षा जास्त क्षमतेने महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

  • यात महत्वाची सूचना अशी की विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेलं असणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांना प्राधान्याने महाविद्यात बोलावलं पाहिजे.

  • कोरोना लसीकरण पूर्ण झालेले नसतील तर विद्यापीठ, महाविद्यालयाने पुढाकार घेऊन जिथल्या स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय परिसरातच लसीकरण राबवले पाहिजे. 

  • ज्या परिसरात कोरोना वाढण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी स्थानिक प्रसासनाशी चर्चा करुनच कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घ्यायचा आहे.

  • तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थिती पाहून नियमावली बदलण्याचा अधिकारी आम्ही विद्यापीठ, महाविद्यालयांना दिलं आहे. 

  • परिस्थितीनुसार प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळी नियमावली तयार करायची आहे.

  • जे विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन सोय महाविद्यालयांनी करुन द्यायची आहे. 

  • टप्प्याटप्प्याने वसतीगृह सुरू करण्यास आम्ही परवानगी देण्यात आली आहे.

  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या सूचना आम्ही विद्यापीठ आणि महाविद्यालयांना दिली आहे.

  • ज्यांनी दोन डोस घेतले आहेत अशा विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी विनंती आहे की कोरोना नियम पाळणे बंधनकारक आहे.


पुण्यातील महाविद्यालये सुरू होण्याची साशंकताच


राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देखील आजपासून महाविद्यालये सुरु करण्याच्या सूचना दिल्यात.  मात्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे,  अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील किती महाविद्यालये आज लगेच सुरु होतील याबद्दल शंका आहे.  कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऐनवेळेस महाविद्यालयांना काम सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  त्याचबरोबर विद्यापीठाचे यावर्षीचे पहिले शैक्षणिक सत्र आज म्हणजे 20 ऑक्टोबरलाच संपत आहे.  त्यामुळे उद्या लगेच पुणे जिल्ह्यातील किती महाविद्यालये सुरु होतील याबद्दल शंकाच आहे.