Maharashtra to lift all Covid-19 restrictions : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्येमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये तर एकही कोरोना रुग्ण आढळत नाही. त्यातच सक्रीय रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एक एप्रिलपासून आता राज्यात कोरोनाचे निर्बंध नसतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा आणि मिरवणुका काढण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.


जवळपास दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचे निर्बंध होते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे निर्बंध कडक करण्यात आले होते. निर्बंधाच्या काळात लसीकरणही वेगाने झाले. परिणामी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना निर्बंध कमी करण्यात आले आहेत. मार्च 2020 पासून राज्यात कोरोना निर्बंध लादण्यात आले होते. तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्र निर्बंधमुक्त झाला आहे. कोरोना निर्बंध हटवले तरी मास्कचा वापर नागरिकांनी करावा यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने आवाहन करण्यात आले आहे. 


जवळपास दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधात बांधलेला महाराष्ट्र आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निर्बंधमुक्त होत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतला. 1 एप्रिलपासून कोरोनाचे सर्व निर्बंध आता मुक्त होतील. महत्त्वाचं म्हणजे मास्क लावण्याचीही सक्ती नसेल. मात्र निर्बंधमुक्त केलं असंल तरी खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. मास्क वापरणे ऐच्छिक असेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.  गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता महाराष्ट्रात कोणतेही निर्बंध नसतील. गुढीपाडव्याच्या शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद यासारखे सण-उत्सव उत्साहात साजरे करता येणार आहेत. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले? - 
गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.


महाराष्ट्रात उद्यापासून काय काय बदलणार? 
- 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात करोनाचे सर्व निर्बंध हटतील
- मार्च 2020 ते 31 मार्च 2022 जवळपास दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध संपुष्टात येतील
- गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान उत्साह साजरा करता येणार
- केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग कायम असेल
- मात्र महाराष्ट्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल
- हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही
- लग्न किंवा कौटुंबीक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही.
- बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लशीचं प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. 
- सार्वजनिक ठिकाणं, मॉल, बगिचे याठिकाणी मास्क वापरणे किंवा लशीचं प्रमाणपत्र धाखवण्याची गरज भासणार नाही.
- महारष्ट्रभरात सर्वधर्मीयांचे सर्व उत्सव निर्बंधमुक्त असतील, यात्रा-जत्रा धुमधडाक्यात होणार
- निर्बंधामुळे उद्योग आणि व्यवसायांवर आलेली बंधनं हटली आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल.