मुंबई : मुलगी कुरुप असेल तर जास्त हुंडा द्यावा लागतो, हे विधान कुठल्याही बेताल नेत्याने केलेलं नाही, तर महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेल्या बारावीच्या पुस्तकात प्रकाशित केलं आहे. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट पुस्तकात अशाप्रकारचं वक्तव्य आल्याने आश्चर्य आणि चीड व्यक्त केली जात आहे.


मुलगी कुरुप किंवा दिव्यांग असेल तर तिच्या पालकांना जास्त हुंडा द्यावा लागतो असं कारण महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाने प्रमाणित केलेल्या बारावीच्या पुस्तकात आहे. समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकात 'देशातील प्रमुख सामाजिक समस्या' असं प्रकरण आहे. त्यामध्ये हे भाष्य करण्यात आलं आहे.

हुंडा का दिला जातो किंवा घेतला जातो हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. जात, धर्म, सामाजिक प्रतिष्ठा यासारख्या अनेक कारणांपैकी मुलीची कुरुपता किंवा व्यंग हे एक कारण असल्याचं यात म्हटलं आहे.

कुरुपतेमुळे मुलीचं लग्न जमवणं काहीवेळा कठीण होतं. तिचं लग्न जमवण्यासाठी तिच्या घरची मंडळी हतबलतेतून मुलाला हुंडा देतात. त्यातून हुंड्यासारख्या प्रथांना प्रोत्साहन मिळतं, असं या पुस्तकात म्हटलं आहे. या कारणामुळे वाद निर्माण झाला असून अनेक स्वयंसेवी संघटनांनी या पुस्तकांवर टीका केली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाला याबाबत विचारणा केली असता, याकडे लक्ष देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर मामने यांनी चौकशी करुन प्रतिक्रिया देऊ असं म्हटलं आहे.