मुंबई: राज्यात उद्या विविध संघटनांनी बंद पुकारला असला तरीही तलाठी भरतीची परीक्षा होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं असं आवाहन परीक्षा आयोजन करणाऱ्या संस्थेने केलं आहे. त्यासंबंधित एक मेल सर्व उमेदवारांना पाठवण्यात आला आहे. 


जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी राज्यातील विविध संघटनांनी उद्या म्हणजे सोमवारी बंद पुकारला आहे. त्यामुळे वाहतूकीमध्ये अडचणी येण्याची शक्यता असून त्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन उमेदवारांनी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे. 


राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू असून त्याचा एक टप्पा सोमवारी पार पडणार आहे. जालन्यामध्ये घटना घडली असली तरी त्याचा परिणाम परीक्षेवर होणार नसून परीक्षा ही वेळेतच होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.


काय म्हटलंय मेलमध्ये? 


ज्या संस्थेकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे त्या संस्थेकडून सर्व उमेदवारांना मेल करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटलंय की, जालना येथे घटलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 4 सप्टेंबर रोजी राज्यात सर्वत्र तलाठी भरती परीक्षा होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर रहावे. उद्या विविध संघटनांनी बंद पुकारला असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आपण परीक्षा केंद्रावर येण्याबाबत आपल्या स्तरावार नियोजन करून परीक्षा केंद्रावर वेळेवर हजर राहण्याची दक्षता घ्यावी.


अनेक उमेदवार परीक्षेला मुकण्याची शक्यता


उद्या तलाठी पेपर होणार असल्याबाबत विद्यार्थ्यांना सध्या मेल येत आहे राज्यात सध्या अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था बंद आहे उद्या अनेक ठिकाणी आंदोलन होणार आहे अशावेळी विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल विभागाने जर अशा मुलांची संधी हुकली तर त्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही आमची मागणी आहे असं स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटलं आहे. 


उद्या संभाजीनगर बंद आहे. परंतु त्याचबरोबर उद्या तलाठी भरती परीक्षा असून काही विद्यार्थी याबत चिंतेत आहेत. एकाही विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. उद्याचा बंद शांततेत असणार असून तुम्हालाच काय कुठल्याही नागरिकाला त्रास देणारा असणार नाही, याची ग्वाही आम्ही देतो अशी ग्वाही मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनी दिली आहे.


ही बातमी वाचा: