सिंधुदुर्ग : कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने भव्य मोर्चा काढला. या मोर्चामध्ये देवगड तालुक्यासह राजापूरमधील नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध असलेले लोक सहभागी झाले होते. हा मोर्चा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयापासून काढण्यात आला.

काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर जाऊन तेथे तहसीलदार वनिता पाटील यांना निवेदन देण्यात आलं.

''नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हा कोकणचा नाश करणारा आहे. या प्रकल्पांतर्गत धरण बांधण्यासाठी देवगड तालुक्यातील पंधरा गावे कणकवली तालुक्यातील दोन गावे प्रकल्पबाधित होणार आहेत. राजापूर देवगड कणकवली या ठिकाणी या प्रकल्पाने हातपाय पसरले आहेत,'' असं नितेश राणे म्हणाले.

''आजतागायत आम्ही अनेक निवेदन दिली. शांततेत मोर्चा काढले. मात्र शासनाला त्याची किंमत नाही. निवेदन दिले तर टिंगलटवाळी केली जाते. यापुढे शांततेत काढलेला हा शेवटचा मोर्चा असून प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्यास कायदा हातात घेण्यास मागे पुढे पाहणार नाही. तुमचे कितीही पोलीस बळ वापरा, आर्मी आणा; पण आमची ताकद आम्ही तुम्हाला दाखवून देऊ,'' असा इशारा नितेश राणे यांनी दिला.