मुंबई: राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांना लागली आहे. या आधी दहावीचा निकाल हा 20 जून पर्यंत लागेल असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितलं होतं. 


बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 10 जूनपर्यंत जाहीर करणार असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल असं राज्याच्या शिक्षण मंडळाकडून या आधी सांगितलं होतं. 


राज्यातील विनाअुनदानीत शाळांच्या शिक्षकांनी या आधी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती. परंतु जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं. आता त्या प्रमाणे बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे येत्या एक-दोन आठवड्याच्या काळात दहावीचाही निकाल लागण्याची अपेक्षा आहे. 


शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे बारावीचा निकाल लागण्यासाठी उशीर झाला. बारावीच्या निकालानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याची शक्यता आहे. 


यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. याअंतर्गत बहुतांश परीक्षांची पहिली शिफ्ट सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या वेळेत सुरु होती. तर दुसऱ्या सत्राची वेळ दुपारी 3 ते 6.30 अशी होती. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहू शकता. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकतो. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.