मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागात खळबळ उडवून देणारा एक मोठा गैरप्रकार समोर आला आहे. जमिनीचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या ७/१२ (सातबारा) उताऱ्यात फेरफार करून तब्बल एक ते दीड लाख शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची धक्कादायक कबुली खुद्द सरकारने दिली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम १५५ चा चुकीचा अर्थ लावून महसूल अधिकाऱ्यांनी हे बेकायदेशीर आदेश पारित केल्याचे उघड झाले आहे.
Revenue Department Land Scam : नेमके प्रकरण काय आहे?
जमीन महसूल कायद्यातील कलम १५५ चा वापर प्रामुख्याने ७/१२ उताऱ्यावरील 'लेखनदोष' किंवा 'शुद्धलेखनातील चुका' दुरुस्त करण्यासाठी केला जातो. मात्र, पुणे जिल्ह्यात काही महसूल अधिकाऱ्यांनी या कलमाचा गैरवापर करून जमिनीच्या मालकी हक्कांतच परस्पर बदल केले. जुलै-ऑगस्ट २०२५ दरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
आमदार अनिल परब यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष वेधल्यानंतर महसूल विभागात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती.
विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात महसूल प्रशासनातील भोंगळ कारभाराचे वाभाडे काढण्यात आले आहेत. अनेक प्रकरणांत मूळ मालकाची संमती नसतानाही ७/१२ मध्ये बदल करण्यात आले. नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर आदेश पारित करून खाजगी हितसंबंध जपले गेले. जमिनी बिगरशेती (NA) करताना आणि मालकी हस्तांतरित करताना गंभीर अनियमितता आढळली.
Chandrashekhar Bawankule On Land Scam : बावनकुळेंची विधान परिषदेत कबुली
या प्रकरणावर विधान परिषदेत वादळी चर्चा झाली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय स्तरावर झालेल्या या मोठ्या चुकीची कबुली दिली. "शुद्धलेखनात बदल करण्याच्या नावाखाली सातबारा बदलले गेले, ही बाब गंभीर आहे. महसूल खात्याच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असू शकतो," असे विधान त्यांनी सभागृहात केले. सुमारे १ ते १.५ लाख शेतकरी या प्रक्रियेत भरडले गेल्याचेही त्यांनी मान्य केले.
आमदार अनिल परब यांनी या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि सहभागी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार, आता या घोटाळ्यातील दोषी तहसीलदारांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोणावर कारवाई होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र अधिवेशन संपायच्या आत दोषींवर कारवाई करू असा आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिलं.
ही बातमी वाचा:
