Maharashtra Rain Updates:महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत, विशेषतः धरण क्षेत्रांत सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केल्याने पंचगंगा नदीचे पाणी यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. दुसरीकडे, पुण्यात पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यातही वाढ झाली असून, सांगली विभागाने कृष्णा खोऱ्यात संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी कर्नाटक प्रशासनाला अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याची विनंती केली आहे.

Continues below advertisement

Kolhapur Rain Updates: कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी 28 फुटांवर; 19 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी सध्या 28 फूट 8 इंचांवर पोहोचली असून जिल्ह्यातील तब्बल 19 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात 76 टक्के तर काळम्मावाडी धरणात 42 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शहरात पावसाची उघडझाप असली तरी धरण क्षेत्रात रिमझिम पाऊस कायम आहे.

Pune Rain Updates: पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 61.81 टक्के पाणीसाठा

पुणे आणि परिसरात धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या तुरळक आणि मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमध्ये एकूण 18.02 टीएमसी म्हणजेच 61.81 टक्के पाणीसाठा झाला आहे.

Continues below advertisement

Pune Dam Water Level: धरणनिहाय पाणीसाठा 

खडकवासला (Khadakwasla): 64.75 टक्के 

पानशेत (Panshet): 67.26 टक्के

वरसगाव (Varasgaon): 61.85 टक्के

टेमघर (Temghar): 44.40 टक्के

येत्या आठवड्यात पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धरणांमधील वाढता साठा लक्षात घेता महापालिकेने 22 जुलैपर्यंत पुण्यातील पाणीकपात रद्द केली आहे.

Sangli: सांगली पाटबंधारे विभागाचे कर्नाटक प्रशासनाला तातडीचे पत्र 

कृष्णा नदीच्या धरण क्षेत्रासह मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पाऊसामुळे नदीचा प्रवाह वेगाने वाढत आहे. गतवर्षांच्या अनुभवावरून जुलैअखेर आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पर्जन्यमान जास्त असते. त्यातच यंदा अलनिनोचा प्रभाव सक्रिय असल्याने काही भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे. ही संभाव्य पूरस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक शासनाला आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.

Sangli: प्रमुख मागण्या आणि सद्यस्थिती

- मान्सूनच्या काळात कृष्णा नदी प्रवाहीत ठेवण्यासाठी हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत. (20 जुलै रोजी सकाळी 8 वाजता हिप्परगी बॅरेजची पाणीपातळी 522.60 मीटर असून आवक 36,400 क्युसेक्स तर जावक 34,450 क्युसेक्स आहे).

- को. प. बंधारा राजापूर येथे पाणीपातळी 524.483 मीटर असून 35,208 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

- ऑगस्टच्या मध्यापर्यंत अलमट्टी धरणाची पाणीपातळी 517.00 ते 517.50 मीटरदरम्यान मर्यादित ठेवावी. सध्या धरणाची पातळी 517.680 मीटर असून त्यात 40,173 क्युसेक्स आवक आणि 16,458 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे की, अतिवृष्टी झाल्यास कृष्णा नदी प्रवाहीत ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याने कर्नाटकाने अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग तातडीने वाढवणे गरजेचे आहे.

आणखी वाचा 

Monsoon Rain Update 2026: कुठे मुसळधार तर कुठे विजांचा कडकडाट! पुढील 24 तास महत्त्वाचे, आठवडाभर राज्यातील हवामान कसं असणार? जाणून घ्या एकाच क्लिकवर