Maharashtra Rain Update: राज्यात मान्सून (Monsoon) पूर्णपणे सक्रिय झाला असून, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चारही जिल्ह्यांसाठी पुढील 3 तासांसाठी 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी केला आहे.

Continues below advertisement

सकाळी 7 वाजता या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला होता, मात्र पावसाचा वाढता वेग पाहून अवघ्या एका तासात हवामान विभागाने हा इशारा अपग्रेड केला आहे. पुढील 3 तासांत प्रति तास 15 मिमीहून अधिक मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, नागरिकांना अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Maharashtra Rain Update: प्रमुख जिल्ह्यांमधील पावसाची सद्यस्थिती 

1. मुंबई आणि उपनगर 

मुंबईत पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. काही भागांत 24 तासांत 200 मिमीपर्यंत अतिवृष्टी (Heavy Rainfall) होण्याची शक्यता आहे. मात्र, या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात  पाणीसाठा वाढणार असून, मुंबईकरांवरील पाणीसंकट दूर होण्यास मदत होणार आहे.

Continues below advertisement

2. पालघरमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी 

गेल्या 3 दिवसांपासून पालघरला पावसाने झोडपून काढले आहे. आजच्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. धामणे आणि कवडास ही प्रमुख धरणे ओसंडून वाहत असून जव्हार-मोखाड्यातील पाणीटंचाई मिटली आहे. तसेच भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे.

3. ठाण्यात जोरदार पाऊस

ठाणे आणि सखल भागात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते, मात्र पालिका प्रशासनाने पाण्याचा निचरा तातडीने केल्याने वाहतूक सुरू आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच घोडबंदर रोड, कल्याण आणि नाशिककडे जाणारी वाहतूक सध्या संथ गतीने सुरू आहे.

4. रायगडमध्ये दरडप्रवण गावांना सतर्कतेचा इशारा 

रायगड जिल्ह्यासाठी 2 ते 4 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 382 दरडप्रवण गावांना आणि नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अशा संवेदनशील गावांमध्ये देखरेखीसाठी पालक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

5. लोणावळा, तळकोकणात पावसाची जोरदार बॅटिंग 

लोणावळ्यात गेल्या 24 तासांत 113 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, यंदा आतापर्यंत अवघा 586 मिमी पाऊस झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या (2061 मिमी) तुलनेत खूपच कमी आहे. तर तळकोकणात रात्रभर झालेल्या पावसामुळे सावंतवाडीतील माडखोल धरण 100 टक्के भरले आहे. मालवणमध्ये झाड कोसळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टीवर ताशी 40 ते 60 किमी वेगाने वादळी वारे (Strong Winds) वाहणार असल्याने सर्व बंदरांवर '3' नंबरचा धोक्याचा बावटा फडकवण्यात आला आहे. तसेच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आणखी वाचा 

Mumbai Rains Latest Upates: पावसामुळे लोकल वाहतुकही खोळंबली, दक्षिण मुंबईवर काळ्या ढगांचे सावट, समुद्रात उंच लाटा; संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत