Maharashtra Rain News : राज्याच्या काही भागात पावसानं उघडीप दिली असली तरी काही भागात मात्र, अद्यापही पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. विशेषत: या पावसामुळं कापूस आणि सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान, राज्यात कुठं कुठं पाऊस पडत आहे? हवामान विभागाचा अंदाज काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

Continues below advertisement


हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज यवतमाळ जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सकाळपासूनच ढगाळी वातावरण निर्माण झाले होते अशातच रात्री साडेनऊच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.  ग्रामीण भागात  पावसाने गंजी लावलेल्या सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा कापूस वेचणीला आणि सोयाबीन सोंगणीला सुरुवात झाल्याने पडत असलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरत आहे. आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झालं आहे. यात आता पिके काढणीच्या वेळेस होत असलेल्या पावसामुळे हाती येत असलेले पिकांचे नुकसान होत आहे. आधीच शेतकरी अतिवृष्टीने आर्थिक संकटात सापडला असताना आता पुन्हा  पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हतबल झाला  आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात तुरळक पाऊस पडेल असा इशारा  देण्यात आला आहे. 


चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी


चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या "मोंथा" चक्रीवादळाचा परिणाम, हवामान खात्याने मोंथा वादळामुळे चंद्रपुरात पावसाचा इशारा दिला होता. आज सकाळपासून चंद्रपूर जिल्ह्यात होते ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी मात्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने वातावरणात गारठा वाढला असून मुसळधार पावसाने शेतातील कापणीला आलेले धान आणि कापसा सोबत इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात असताना मोंथा चक्रीवादळाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वाढवली चिंता, मोंथा चक्रीवादळाचा जिल्ह्यात आणखी दोन दिवस परिणाम राहण्याची शक्यता आहे. 


लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस


लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मांजरा, रेणा आणि तावरजा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेले आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रात्रभर जोरदार पाऊस झाला आहे. लातूर, औसा, रेणापूर आणि निलंगा तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या. या पावसामुळे नदी, नाले आणि ओढे भरून वाहू लागले असून मांजरा, रेणा आणि तावरजा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे रेणापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी पाण्यात वाहून गेल्या. काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेतील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. हवेत गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.