Rain News : सकाळपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं शेतकरी (Farmers) वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. कारण उभी पिकं पाण्याअभावी वाया जाण्याच्या मार्गावर होती. मात्र, या पावसानं पिकांना जीवदान मिळालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्याती दापोलीत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील 24 तासात दापोलीत 245 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. पुढील दोन दिवस हवामान विभागानं जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळं खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळं तेथील प्रशासन सतर्क झालं असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाहुयात गेल्या 24 तासात कुठं किती पावसाची नोंद झाली.
नाशिक - 69.6 - मिलिमीटर
नांदेड - 16.2 - मिलिमीटर
जळगाव - 35 - मिलिमीटर
पुणे - 11.8 - मिलिमीटर
कुलाबा - 52.8 - मिलिमीटर
ठाणे - 58.6 - मिलिमीटर
दापोली - 245 - मिलिमीटर
जालना - 22 - मिलिमीटर
रत्नागिरी - 188 - मिलिमीटर
माथेरान - 87.6 - मिलिमीटर
परभणी - 6.7 - मिलिमीटर
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. कुठं हलका तर कुठं मध्यम स्वरुपाता पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसापासून पावसानं चांगलीच ओढ दिली होती. मात्र, आता पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा मिळाला आहे. पाण्याअभावी पीकं माना टाकू लागली होती. अशा पिकांना आता जीवदान मिळणार आहे. दरम्यान, राज्यातील मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. त्याचबरोबर वाशिम, नंदुरबार, पुणे, नाशिक जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली.
मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, भांडुप, मुलुंड या सर्व विभागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यामुळे एलबीएस मार्गावर सखल भागात पाणी भरले आहे.