Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसानं झालं आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. तसेच विदर्भातील अकोला जिल्ह्यात या परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. तसेच बीड, नागपूर,गडचिरोली, चंद्रपूर, पुणे या जिल्ह्यांना पावसानं चांगलच झोडपलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Department of Meteorology) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अकोल्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, नागरिकांचं मोठं नुकसान
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. पावसामुळं बोर्डी गावाला नदीचं स्वरुप आलं आहे. अकोट तालुक्यातील बोर्डी परिसराला पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे. 1965 नंतर आलेल्या सर्वात मोठ्या पुराचा मोठा फटका बोर्डी गावाला बसला आहे. या गावात पावसानं अनेक घरात पाणी घुसलं आहे. अनेक घरांच्या भिंती देखील पडल्या आहेत. या पावसामुळं गावाशेजारुन वाहणाऱ्या घोगा आणि लेंडी नाल्याचं पाणी गावात घुसलं होतं. या गावात या पुरामुळे अनेक संसार उघड्यावर पडलेत. धान्य, शेतमाल, संसारोपयोगी वस्तू अक्षरश: मातीमोल झाल्या आहेत.
बीडमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांचं मोठं नुकसान
बीड (Beed) जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला असून अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. बीडसह माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. बीड तालुक्यातील नागझरी येथून उगम पावणाऱ्या बिंदुसरा नदीला देखील या पावसानं पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे नागझरी येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालं आहे. या पावसासह वीज पडल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
नागपूर पाऊस
शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून अधूनमधून पाऊस होत आहे. या परतीच्या पावसाने शहरवासीयांची दाणादाण उडविली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण आठवड्यात विदर्भात कमीअधिक प्रमाणात पावसाचा खेळ सुरुच राहणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतावर सध्या ढगांची दाटी झाली आहे. त्याचा सर्वाधिक प्रभाव मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह विदर्भात दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: