Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळालं. तसेच वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, वर्धा, अहमदनगर, बुलडाणा या भागात देखील पावसानं हजेरी लावली. दरम्यान, आजही राज्यात जोरदार पावासाचा इशारा हवामान विभागानं (Meteorological Department) दिला आहे. आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तसेच नाशिक आणि पालघर जिल्ह्यातही हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोदार पावसानं हजेरी लावल आहे. या पावसामुळं काही ठिकाणी शेतीच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्याच्या विविध पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग आणि ठाण्यात आज 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांना पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.


ऑरेंज अलर्ट म्हणजे नेमकं काय?


कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस असेल त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून दिला जातो.  ऑरेंज अलर्टमध्ये, रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते.  ऑरेंज अलर्टचा अर्थ त्या भागात कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.


नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस


नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळं कापूस पिकासह अनेक पिकांना फायदा होणार आहे. त्यामुळं या पावासामुळं शेतकरी समाधानी असल्याचे चित्र दिसत आहे.  


रत्नागिरीत जोरदार पावसाची हजेरी, शेती पाण्याखाली


रत्नागिरीत जेखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. संगमेश्वर इथे मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे संगमेश्वरमधील गड नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुराची तीव्रता वाढण्याची भीती आहे. गड नदी लगत असलेली अनेक हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे 


पुढील तीन चार दिवस मान्सून सक्रिय राहणार


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस आणि त्यापुढील  दिवसात मान्सून राज्यात सक्रिय राहणार आहे. तर काही जिल्ह्यात अतिवृष्टी देखील होण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा वाढता परिणाम होऊ शकतो. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.