Maharashtra Rain : राज्यात पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच रेल्वेची वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. तसेच पुणे, सिंधुदुर्ग, अहमदनगर, नाशिक, लातूर, परभणी आणि नांदडेमध्येही पावसानं हजेरी लावली. दरम्यान, आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच मुंबई ठाणे परीसरातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट म्हणजे नेमकं काय?
महिन्याभराच्या विश्रांतीनंतर नांदेडमध्ये पावसाचे आगमन
तब्बल महिन्याभराच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. विजांच्या गडगडाटासह जिल्हाभरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात जून ते जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत जोरदार पाऊस झाला. जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जिल्हाभरात जोरदार अतिवृष्टी झाली. दरम्यान या दोन महिन्यात नांदेड जिल्ह्यात तब्बल 850 मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली व जिल्हा भरातील छोटेमोठे 36 प्रकल्प तुडुंब भरले. पण त्यानंतर पावसाने उघडीप घेत तब्बल एक महिना दडी मारली. ज्यामुळे बहरात आलेली सोयाबीन, उडीद, मूग, कापूस ही पिके अक्षरशः वाळून गेली. आता एक महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्हाभरात पावसाचे आगमन झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी
नाशिक शहरासह जिल्ह्याभरात पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसानं शहरातील रस्त्याना नद्यांचे रूप आल असून उड्डाण पुलासह शहरातील महत्वाच्या रस्त्यावर जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पावसामुळे शहरातील सराफ बाजारात पाणी साचलं आहे.