Maharashtra Rains Updates: परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसानीचा सामना करावा लागत आहे.  परतीच्या पावसानं शेती पिकांना मात्र, मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, मूग, यासह भाजीपाला द्राक्ष पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या परतीच्या पावसानं हिरावून घेतला आहे.  राज्यात 1 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या 12 दिवसात सरासरी 7 दिवस पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. परतीच्या या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करु नये असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. 


परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करणार असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
  
कृषी विभाग, महसूल विभाग व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पणे परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. पंचनामा करतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहत कामा नये अशा सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
 
राज्य शासनाने आतापर्यंत जवळपास 6 हजार कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे. एनडीआर च्या निकषापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेला आहे .यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे ना. अब्दुल सत्तार म्हणाले. 
 
नुकसानग्रस्त भागाचा करणार दौरा


गेल्या जुलै - ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी दौरा केला होता. त्याच पद्धतीने परतीच्या पावसातील नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हानिहाय पाहणी दौरा करणार आहेत.


ही बातमी देखील वाचा


मुंबई, पुण्यासह राज्याला परतीच्या पावसानं झोडपलं, शहरातील रस्ते पाण्यात, गावखेड्यात नदी-नाले तुडुंब