Maharashtra Rain: महामुंबई क्षेत्रात यंदाच्या मान्सूनने (Monsoon) चांगली कामगिरी केली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मान्सून सक्रिय राहिल्याने मुंबईच्या एकूण पाऊसमानाला (Rainfall) मोठा फायदा झाला आहे. ‘एल निनो’ (El Nino) परिस्थिती असतानाही काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) मुंबईतील पावसाची सरासरी गाठण्यास मदत झाली आहे.

Continues below advertisement

कुलाबा (Colaba) येथे 13 ऑगस्टच्या सकाळपर्यंत यंदाच्या मोसमात 1 हजार 725.2 मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे, कुलाबा येथे ऑगस्टअखेरपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाचे प्रमाण 1 हजार 716.8 मिलिमीटर आहे. त्यामुळे यंदा कुलाब्याने ऑगस्टअखेरची सरासरी आताच ओलांडली आहे. दुसरीकडे, सांताक्रूझ (Santacruz) येथे 1 जूनपासून आतापर्यंत 2 हजार 100 मिलिमीटरच्या आसपास पाऊस झाला आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत सांताक्रूझ येथे सरासरी 2 हजार 205.8 मिलिमीटर पावसाची नोंद होते. त्यामुळे सप्टेंबरअखेरची सरासरी गाठण्यासाठी सांताक्रूझला आणखी सुमारे 104 मिलिमीटर पावसाची गरज आहे.

Konkan Rain: पुढील दोन आठवडे कोकणात पावसाचा जोर

हवामान विभागाने (IMD) जाहीर केलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. 13 ते 20 ऑगस्ट या कालावधीत कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 20 ते 27 ऑगस्ट या कालावधीतही कोकण किनारपट्टीवर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई आणि उपनगरांत पावसाच्या आणखी काही जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. तसेच सांताक्रूझ येथील सप्टेंबरअखेरची सरासरी पूर्ण करण्यासाठीही या पावसाचा फायदा होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

Maharashtra Rain: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम

दरम्यान, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र पुढील 24 तासांत झारखंड ओलांडून वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर या प्रणालीची तीव्रता कमी होईल; मात्र तिचा प्रवास वायव्य दिशेने सुरू राहण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांवर परस्परविरोधी दिशेने वाहणारे वारे सक्रिय आहेत. या वातावरणातून तयार झालेल्या चक्रीय वातस्थितीचा परिणाम महाराष्ट्रातील विविध भागांवर होण्याची शक्यता आहे. निवृत्त हवामान विभागाचे अधिकारी माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, या वातावरणामुळे कोकण, विदर्भ, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.

Pune Rain: पुढील तीन दिवस पुण्यात रिमझिम सरी

पुणे (Pune) शहरासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पुढील तीन दिवस हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. घाटमाथ्यावर मात्र जोरदार, तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Pune Rain: ऑगस्टमध्ये पुण्यात पावसाची विश्रांती

गेल्या आठवडाभरापासून पुणे शहरातील पावसाचा जोर कमी झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरी असे वातावरण पाहायला मिळत आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. घाटमाथ्यावरही सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. गुरुवारी पुणे शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी नऊच्या सुमारास मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांत जोरदार सर आली. मात्र, त्यानंतर सुमारे तासाभरात पुन्हा ऊन पडले. दुपारनंतर शहरात वाऱ्याचा वेग वाढला. गुरुवारी दिवसभरात पुण्यात 1.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहराचे कमाल तापमान 28.4 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

Maharashtra Rain: 27 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता 

एकीकडे मुंबईने ऑगस्टअखेरची सरासरी ओलांडली असताना सांताक्रूझला सप्टेंबरअखेरची सरासरी पूर्ण करण्यासाठी आणखी सुमारे 104 मिलिमीटर पावसाची गरज आहे. पुढील दोन आठवड्यांत कोकण किनारपट्टीवर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असल्याने ही तूट भरून निघण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र, चक्रीय वातस्थिती आणि मान्सूनसाठी तयार झालेले पोषक वातावरण यामुळे मुंबईसह कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील पावसाचे चित्र पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजपासून पुढील पाच दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर अशा 27 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित मराठवाडा आणि अहिल्यानगर व सोलापूर अशा 9 जिल्ह्यात किरकोळ पाऊस होईल, अशी शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज