मुंबई : पुढील 24 तासात महाराष्ट्रातला पावसाचा जोर ओसरणार आहे. मात्र आज पश्चिम किनारपट्टीसह घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मागील 24 तासात सकाळी 8.30 पर्यंत 433 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजसाठी तिन्ही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर घाट माथ्यावर 70-200 मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे. उद्यापासून पावसाचे प्रमाण कमी होणार होणार आहे. 


महाराष्ट्रातला पाऊस कमी होऊन, उत्तर भारतात पावसाचे प्रमाण वाढणार  आहे. आज मुंबईतील वातावरण सामान्य आहे.  मात्र, वातावरणात उष्णता  असल्याने संध्याकाळनंतर पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आले आहे. संध्याकाळनंतर अधूनमधून मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. नाशिकमधील घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शहरी भागात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. 


मराठवाड्यात काही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे. त्यानंतर वातावरण सामान्य राहणार आहे.  विदर्भात पुढील 2-3 दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. आज सर्वच जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.  काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


सातारा आणि कोल्हापुरात मागील 24 तासात पावसाचे जुलै महिन्यातले सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे.  कोल्हापुरात आज सकाळी 8.30 पर्यंत 181 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाचा उच्चांक 2005  साली बघायला मिळाला होता. ज्यात 26 जुलै 2005 साली 174.2 मिमी पावसाची नोंद झाली होती. तिकडे साताऱ्यात देखील सकाळी 8.30 पर्यंत 172 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या आधी 7 जुलै 1977 साली 129.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. 


2019 साली कोल्हापूर महापुरावेळी पंचगंगेची पातळी 55.6 फुटांपर्यंत गेली होती. तर आता घाट माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे हीच पातळी 56.3 फुटांपर्यंत गेली होती. कमी वेळात अधिकचा पाऊस झाल्याने ही परिस्थिती बघायला मिळत आहे. मात्र, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाण्याची पातळी कमी देखील होते आहे.


पावसाची आकडेवारी (सकाळी 8.30 पर्यंत) 



  • सातारा - 172.3 मिमी 

  • नवी मुंबई - 20 मिमी 

  • सोलापूर - 14.6 मिमी 

  • मुंबई (सांताक्रुज) - 5.9 मिमी 

  • मुंबई (कुलाबा) - 13.2  मिमी

  •  रत्नागिरी - 13.1  मिमी 

  • औरंगाबाद - 7.2मिमी 

  • परभणी - 4.2 मिमी 

  • पुणे (शिवाजीनगर) - 80.3 मिमी 

  • पुणे (पाषाण) - 105 मिमी 

  • कोल्हापूर - 181 मिमी 

  • महाबळेश्वर -321  मिमी 

  • नांदेड - 4.2 मिमी 

  • सांगली - 55.8 मिमी


मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भातल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 तासाचा अलर्ट दिला आहे. प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढणार आहे. मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे फ्लॅश फ्लडची देखील शक्यता आहे. पुढील 1 तास नागपुरातील काटोल, रामटेक, अमरावती, हिंगणघाट, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीतल्या काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.