Rain Forecast Maharashtra: राज्यात सध्या मान्सून सक्रीय झाला असून सध्या पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. कोकण घाटमाथ्यावर जोरधारा सुरु असून मध्य महाराष्ट्रात पावसाने कहर झाल्यांचं चित्र आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक मंदिरं गोदावरीपात्रात बुडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय.


दक्षिण गुजरातपासून केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला होता. सध्या  मध्य प्रदेश, राजस्थानच्या लगत हा कमी दाबाचा पट्टा सरकल्याने येत्या काही दिवसात कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर ओरण्याची चिन्हे आहेत. 


कोकण, मध्य महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाची शक्यता


भारतीय हवाामान विभागाने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील 5 दिवस पावसाचा जोर कमी राहणार असला तरी पुणे, सातारा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विदर्भातील काही जिल्हे आणि कोकणात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.


कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?


 पुणे आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून  पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांसह बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा ‘यलो अलर्ट’ आहे. उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज आहे.


 






मराठवाड्यात सोसाट्याचा वाऱ्यासह हलका पाऊस


प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार,कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


कमी दाबाचे क्षेत्र निवळणार


राज्यात कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेश, राजस्थानला जोडून असणाऱ्या परिसरांमध्ये सक्रीय आहे. त्यामुळे राज्यात राजस्थान आणि पाकिस्तान परिसरावर हवेचे कमी दाब क्षेत्र कायम असून, त्याला लागून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे मान्सूनचा आस पुढे सरकल्याचे दिसून आले.


हेही वाचा:


नाशिकमध्ये जोरदार पाऊस! गोदावरी नदीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, संपूर्ण जिल्ह्याला 'यलो अलर्ट'!