Maharashtra Rain : महाराष्ट्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. धुवांधार पावसामध्ये माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत काका आणि पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलुंड येथे राहणाऱ्या काका-पुतण्यावर मृत्यू ओढावल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. 


मुलुंड येथे राहणारे बबन भालेराव हे आपल्या कुटुंबासोबत अहमदनगर येथील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी या गावात शैक्षणिक कामासाठी लागणारे कागदपत्रे आणण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत स्वतः च्या  रिक्षाने जात होते. त्यावेळी माळशेज घाटातील बोगद्याजवळ रिक्षावर दगड कोसळला रिक्षाच्या मागच्या सीटवर बसलेल्या काका पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. राहुल बबन भालेराव वय वर्षे 40 तर स्वयम सचिन भालेराव वय वर्षे 7 या काका पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे मयत राहुल  यांचे वडील बबन हे रिक्षा चालवत होते वाडीलांसमोरच नातू आणि लेकाचा मृत्यू झाला आहे.  रिक्षा चालक बबन यांच्या पत्नी विमल जखमी झाल्या आहेत. या घटनेचा पुणे जिल्ह्यातील ओतूर पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


दरड काढण्याचे काम सुरु - 


खेड मधील अस्तानी धनगरवाडी येथील कोसळलेली दरड काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. खेडचे प्रांत अधिकारी यांनी  घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जेसीबीच्या साह्याने दरडीचा रस्त्यावरती आलेला भाग काढण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. दरम्यान नागरिकांना येण्या जाण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली. डोंगराची कटाई मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मुसळधार पावसात पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. 


सोलापूरध्ये एक जण वाहून गेला


दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे ओढ्याच्या पाण्यात तिघे वाहून गेले. यातील दोन जण बचावले आहेत. तर एकजण बेपत्ता आहे. पाण्याबरोबर वाहून जात असताना प्रवाहातील झाडांना पकडून दोघांना स्वतःला वाचविण्यात यश आले. तर एकजण अद्याप बेपत्ता आहे. ज्ञानेश्वर कदम असे पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  प्रशासनाकडून अद्याप शोध घेण्याचे काम सुरु आहे. 


बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी हे दोघे बचवाले. सोलापुरात सुरु असलेल्या पावसामुळे कासेगाव ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. मध्यरात्री पाणी पुलावरून वाहत असताना तिघांनी दुचाकीवरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे वाहून गेले