Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. पुण्यातील (Pune) मांजरी इथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (Vasantdada Sugar Institute) 46 वी सर्वसाधारण सभा आज पार पडणार आहे. ही सभा सकाळी 11 वाजता होणरा असून, यासाठी मुख्यमंत्री आणि शरद पवार एकत्र येणार आहेत. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे 2021-2022 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे.
विविध पुरस्कारांचं वितरण केलं जाणार
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी सर्वसाधारण सभा आज मांजरी इथं पार पडणार आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत. दरवर्षी या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित ही सभा पार पडत असते. राज्याचे मुख्यमंत्री देखील या सभेला येत असतात. त्यामुळे एकनाथ शिंदे आज या सभेला हजेरी लावणार आहेत. यावेळी विविध पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. राज्याच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही मध्यवर्ती संस्था म्हणून काम करते. या संस्थेमार्फत ऊसाच्या संदर्भात विविध संशोधन, मार्गदर्शन केलं जातं. आजच्या या सभेसाठी सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्याच्या साखर उद्योगातील अन्य नेते देखील हजेरी लावणार आहेत.
वसंतदादा पाटील यांनी केली होती स्थापना
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पूर्वाश्रमीची डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येऊन साखर उद्योगाशी निगडीत शास्त्रीय, तांत्रिक आणि शैक्षणिक संशोधन करण्याकरता स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना 19 नोव्हेंबर 1975 रोजी दिवंगत वसंतदादा पाटील यांनी केली आहे. 1956-57 मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांनी स्वतः शेतामध्ये जाऊन ऊस कसा लावायचा, याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दिले होते. सहकारी साखर कारखान्यांनी साखरेसह उप-उत्पादनांचीही निर्मिती करावी असा आग्रह वसंतदादांनी धरला होता. तसेच कारखान्याच्या परिसरात शिक्षण, आरोग्य, इतर उद्योग आणि मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रांत विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची कल्पना त्यांनी रुजवली. त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्रे आपल्याला दिसतात. वसंतदादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करुन संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट आहे. आज राज्यात छोट्या-मोठ्या सहकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसते. यामध्येही वसंतदादांचा मोठा वाटा आहे.
महत्त्वाच्या बातम्या: