Maharashtra Pune Monsoon Update :  एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळाची (Monsoon Update) भीती निर्माण झाली आहे तर पूर्व मोसमी पावसानेदेखील काही जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. संभाजीनगर, कोल्हापूरमध्ये पूर्व मोसमी पाऊस पडत आहे. काही दिवसांत पावसाचं आगमन होणार आहे. मात्र त्यापूर्वी पुण्यात मुसळधार पाऊस आणि विजांचा गडगडाट होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे पुणेकरांनी पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावसासाठी तयार राहावं, असंही वेधशाळेकडून सांगण्यात आलं आहे. 


पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, आज 15 जून, पुण्यात अंशतः ढगाळ आकाश राहण्याची अपेक्षा आहे, दुपार आणि संध्याकाळपर्यंत हळूहळू ढगाळ वातावरण राहील. दिवसभर हलक्या  पावसाची शक्यता आहे. पावसाच्या सरींनी दिलासा दिल्यानं शहराला कडक उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 16 जून रोजी हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात हलका पाऊस सुरूच राहील. 17 जून रोजी पहाटेच्या वेळी आकाश प्रामुख्याने स्वच्छ असेल, दुपार आणि संध्याकाळच्या दिशेने हळूहळू अंशतः ढगाळ होईल. 18 जून आणि 19 जूनलाही अशाच प्रकारचे हवामान राहणार असल्याचा अंदाज आहे. आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहिल्याने या दिवसांत हलक्या पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 


20 जूनला पुणे वेधशाळेने अगदी हलक्या पावसाच्या शक्यतेसह अंशतः ढगाळ आकाशाचा अंदाज वर्तवला आहे. शहर तुलनेने थंड राहील. काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे.  पावसासोबतच दुपारच्या वेळी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटादरम्यान सुरक्षितता बाळगण्यासाठी पुणे वेधशाळेने काही मार्गदर्शक सूचनादेखील जारी केल्या आहेत. 


पुणे वेधशाळेकडून मार्गदर्शक सूचना जारी...



  • पाऊस आणि विजांचा गडगडाट सुरु असताना झाडांखाली थांबू नये.

  • वीज पडताना मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरु नये

  • जोरदार वारा आणि वीज पडण्याच्या काळात गाडी हळू चालवावी.

  • हेडफोन आणि ब्लुटुथ ईअर पॉड्सचा वापर टाळावा.


शेतकरी प्रतिक्षेत


मागील काही दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेकऱ्याचे हाताशी आलेले पीक आडवे झाले आहे. सोबतच राज्यातील अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. एकीकडे ऊन आणि दुसरीकडे पाऊस असल्याने शेतकरी चिंतेत होता. मागील काही दिवतसांपासून राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत आहेत. काही प्रमाणात पूर्व मोसमी पाऊसदेखील पडत आहे. आता पाऊस लवकर येऊ दे म्हणत पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.