Maharashtra Politics Shivsena : शिवसेनेतील बंडखोर शिंदे गट आणि  भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर आज शिवसेना भवनात आज जिल्हा प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या 40 आमदारांनी केलेल्या बंडानंतर पक्षाच्या पुढील रणनितीवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी विधानसभेतील शिवसेनेसोबत असलेले विधानसभेचे 15 आमदारही शिवसेना भवनात दाखल होणार आहेत. 


शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाले आहे. या बंडाच्या परिणामी महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले असून बंडखोर शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली आहे. आगामी काळात राज्यात मुंबई, ठाणे महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आमदारांच्या बंडखोरीचा फटका या निवडणुकांमध्ये बसू नये यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. पक्ष टिकवण्यासाठी आणि या आगामी निवडणुकांच्या अनुषगांने आता शिवसेनेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आज शिवसेना भवनमध्ये होणाऱ्या बैठकीत जिल्हाप्रमुखांकडून संघटनात्मक आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. 


विधीमंडळ गटनेते पद आणि मुख्य प्रतोदपदी विधीमंडळ सचिवांनी अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांची नेमणूक रद्द केली. तर, एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांची नेमणूक केली आहे. हा निर्णयही शिवसेनेसाठी धक्का असल्याचे समजले जाते. शिवसेनेने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणासह इतर संबंधित प्रकरणांवर 11 जुलै रोजी सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विधीमंडळाचे नियम पायदळी तुडवून दबावात निर्णय घेतले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी केला आहे. 40 आमदारांनी ज्या पद्धतीने पक्षांतर केले आहे, त्यांना गट म्हणून नव्हे तर त्यांना एखाद्या पक्षात सहभागी व्हावे लागेल, असेही प्रभू यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: