Shivsena : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर शिवसेनेने मुखपत्र 'सामना'तील अग्रलेखातून निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील व महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकांच्या खाईत ढकलतील. शिंदे यांच्या फुटीर गटास शुद्ध हेतूने सत्तेवर बसवण्याइतके या मंडळींचे मन मोठे नाही, असे सामनाने म्हटले आहे.
विधीमंडळात बहुमत सिद्ध केल्यानंतर सहा महिन्यांसाठी सरकारला कोणताही धोका नाही असे समजणारे भ्रमात असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील व महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकांच्या खाईत ढकलतील, असेही शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने बंडखोर गटास भाजप पुरस्कृत गट म्हटले आहे. भाजपपुरस्कृत शिंदे गटाच्या सरकारने विधानसभेत बहुमताची चाचणी जिंकली आहे. यात आनंद किंवा दुःख वाटावे असे काही नाही. ज्या परिस्थितीत शिंदे सरकार बनवले आहे त्यामागची प्रेरणास्थळे पाहता महाराष्ट्रात दुसरे काही घडेल याची खात्री नव्हती, असे शिवसेनेने म्हटले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला. फडणवीस यांचे अभिनंदनाचे भाषण हे सरळ सरळ उसने अवसान असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते असे अग्रलेखात म्हटले. मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो, असे विधान यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते गमतीचे आहे. ज्या प्रकारे ते आले ते त्यांच्या स्वप्नातही नसेल. आधीची अडीच वर्ष ते आलेच नाहीत व आताही दिल्लीच्या तडजोडीने ते लंगड्या घोड्यावर बसले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत याचा विसर त्यांना पडू नये. महाराष्ट्रात सत्तांतर घडले त्यात तत्त्व, नैतिकता आणि विचारांचा कोठे लवलेशही दिसत नसल्याचे शिवसेनेने म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणी यशस्वी करणाऱ्या अदृश्य शक्तींचे आभार मानले आहेत. शिंदे हे किती मजबूत, महान नेते आहेत यावर त्यांनी भाष्य केले. पण फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला असल्याचे शिवसेनेने म्हटले. बहुमत चाचणीच्या वेळीस अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे काही आमदार सभागृहात पोहचले नाहीत याचे आश्चर्य वाटले असल्याचे शिवसेनेने म्हटले.
आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असे भासवून चाळीसेक लोक विधिमंडळातून बाहेर पडतात. पक्षाचा आदेश झुगारून मतदान करतात. न्यायालयाचे आदेश पाळत नाहीत. अशा बेकायदेशीर लोकांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे व त्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमाकांचे पद स्वीकारून आपल्यापेक्षा कनिष्ठ नेत्याची भलामण करणे हेच फडणवीस यांच्या राजकीय प्रतिष्ठेचे लक्षण समजायचे काय? असा सवालही शिवसेनेने केला आहे. सत्तेचा अमरपट्टा कुणीच सोबत घेऊन आलेले नाही. शिंदे यांचे सरकारही त्याच पद्धतीचे आहे. सुरत, गुवाहाटी, गोव्यातून ते सरकार एखाद्या सांगाड्यासारखे भाजपच्या रुग्णवाहिकेतूनच अवतरले असल्याचा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला.
ही तर भाजपची कपटी खेळी
शिवसेनेचा विरोध व महाराष्ट्रद्रोह या सूत्रानुसार शिंदे यांचा जीर्णोद्धार झाला. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे भविष्य अंधकारमय आहे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शिंदे हे शिवसेना-भाजप ‘युती’चे मुख्यमंत्री असल्याचे जाणीवपूर्वक बोलून लोकांत भ्रम पसरवला जातो. हीच तर भाजपची कपटी खेळी असल्याचे शिवसेनेने म्हटले. 2014 साली याच लोकांनी ‘युती’ तोडली. 2019 साली याच लोकांनी ‘युती’चा म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मग आता फडणवीस कोणत्या युतीची शेखी मिरवत आहेत, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
सत्तेसाठी झालेले बंड
शिवसेना आमदारांचे हे बंड नसून उठाव असल्याचे विधानसभेत बंडखोर आमदार गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यावरही सामनात भाष्य करण्यात आले. एकनाथ शिंदे यांचे बंड म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही व त्यांच्या सोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत असा टोलाही लगावला आहे. बंडखोरांचे बोलणे व डोलणे काही दिवसांचे आहे. सत्ता व संपत्ती यासाठी झालेले बंड ऐतिहासिक व तात्त्विक नसते. त्यास नीतिमत्तेचा कितीही मुलामा दिला तरी त्या बंडाला तेज प्राप्त होत नाही! भाजपने घडवून आणलेल्या बंडाची तीच स्थिती आहे. बहुमत जिंकले. सहा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा असल्याचे शिवसेनेने म्हटले.