Jitendra Awhad: विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. माझ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवताना आयपीसी 354 कलम  लावले. हे माझ्या मनाला लागले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. समाजामध्ये माझी बदनामी व्हावी, यासाठीच हा षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. यावेळी बोलताना आव्हाड भावूक झाले. इतक्या खालच्या पातळीचा राजकारण होऊ नये, घरे उद्धवस्त होतील असेही आव्हाड यांनी म्हटले. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधान 354 अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर आव्हाड यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुंब्रामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आरोप फेटाळून लावले. 


जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, मला जे कलम लावलेले त्याच्याबद्दल वाईट वाटलं. माझ्या खूनाचे षडयंत्र रचल्याचा आरोप लावला असता तरी चालले असते. मात्र, विनयभंगाचा आरोप मान्य नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले. भादंवि हे 354 कलम लावणे हे माझ्या मनाला लागले असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. माझ्या मुलीला तिच्या मैत्रिणी विचारतात की विनयभंगाची केस तुझ्या वडिलांवर? त्यापेक्षा राजकारणात नकोच असेही त्यांनी म्हटले.


समाजामध्ये मान खाली जाईल, असा आरोप माझ्यावर लावण्यात आले. राजकारण करावे पण इतक्या खालच्या पातळीवर करू नये. याआधीदेखील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले आणि तिथे बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली असे आव्हाड यांनी सांगितले. माझ्याविरोधात ओढूनताणून गुन्हा नोंदवला जात आहे. काहीही कारण नसताना आम्हाला कोठडीत ठेवले. त्यामुळे आम्ही माफी मागणार नाही असेही त्यांनी म्हटले. 


 हा विनयभंग आहे की नाही? हे मुख्यमंत्र्यांनी सांगाव: जयंत पाटील यांचे आवाहन


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, तातडीने सांगलीतून मुंबईकडे धाव घेतली. "मी इथे जितेंद्र आव्हाड यांची समजूत काढण्यासाठी आलो आहे. त्यांच्यावर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा हा चुकीचा आहे," असं यावेळी जयंत पाटील म्हणाले. माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं नाही. मी का बोलतोय मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे कारण ते तिथे होते. त्यांनीच सांगावं की हा विनयभंग आहे की नाही? असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. 


तक्रार देणाऱ्या भगिनी जेव्हा मुख्यमंत्री यांच्या गाडीकडे येतात तेव्हा जितेंद्र आव्हाड बाजूला जाण्यासाठी या महिलेला सांगतात. एवढं भाष्य करून ते पुढे निघून जातात. यापेक्षा वेगळं काही नव्हतं. तरी गुन्हा दाखल होतो, हे आश्चर्य वाटतं असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.