Gopichand Padalkar on sharad pawar : शरद पवार यांच्याविषयी बोलताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. राज्यात विविध जमातींच्या विविध प्रश्नांवर शरद पवारांनी घाण आणि नीच राजकारण केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. ते धुळ्यात बोलत होते. आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नांवर आदिवासी विकास मंत्रीच गौडबंगाल करत असल्याचा आरोप करीत यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना घरचा आहेर दिला. 


कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज धुळ्यामध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कोळी समाजाची सभा पार पडली. या सभेत शरद पवारांविषयी बोलताना  गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. राज्यात विविध जमातींच्या विविध प्रश्नांवरती पवारांनी घाण आणि नीच राजकारण केल्याचा आरोप यावेळी गोपीचंद पडळकर यांनी केला. 


धनगर आरक्षणाला विरोध करणारे लोक पवारांच्या जवळचे 


आदिवासी जमातीसह 33 जमातींवरती अन्याय करायला पवारांनी काही लोक जवळ ठेवली होती आणि ती आदिवासी जमातीचीच होती. धनगर समाजाला आरक्षणास विरोध करणारे लोक देखील पवारांच्या जवळचेच होते. या सर्वांचा सूत्रधार एक आहे, म्हणून मी दरवेळेस पवारांवर बोलतो. शरद पवारांनी घाण व नीच काम केले आहे, असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर घणाघाती आरोप लावत निशाणा साधला आहे.


शरद पवार-संजय राऊत न चालणाऱ्या नोटा 


सरकार पडणार असे म्हणणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार व संजय राऊत या जीर्ण झालेल्या फाटक्या नोटा आहेत. या चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत, म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, सरकार फुल स्ट्रॉंग आहे. अडीच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना देखील आमचा एकही आमदार फुटला नाही. परंतु शरद पवार यांची सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार त्यांना सोडून पळायला लागले. मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेचे 50 आमदार पळाले, असे पडळकर म्हणाले. 


पहाटेच्या शपथविधीवर काय म्हणाले पडळकर?


शरद पवारांचा चेहरा अगोदरच विश्वासघाताने गद्दारीने पाठीत खंजीर खुपसण्याने काळवंडलेला होता. मागच्या महिन्यामध्ये त्यांच्याच पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं. फडणवीस साहेबांनी एकच वाक्य टाकल्यामुळे शरद पवारांचा मूळचा काळवंडलेला चेहरा आता डांबरासारखा काळा झाला आहे, असे पहाटेच्या शपथविधीवर बोलताना पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.