Sanjay Raut : शरद पवारसाहेब हे खंबीर नेते आहेत. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा पक्षाला कमजोर करणारा असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. जस ठाकरे तिकडे शिवसेना. तसं शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असे संजय राऊत म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'ला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाकट्ट्याचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत सहभागी झाले होते. त्यावेळी राऊतांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.


विरोधी पक्षांवर यंत्रणांचा दबाव


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी मी फार बोलणं योग्य होणार नाही. पण सद्या ईडी आणि सीबीआयचा वापर करून पक्ष फोडले जात असल्याचे राऊत म्हणाले. याबाबत शरद पवार यांनी सीबीआय आणि गृहमंत्री अमित शाह याना एक पत्रही लिहलं आहे. यामध्ये त्यांनी राजकीय नेत्यांवर, विरोधी पक्षांवर कसा दबाव आणला जात आहे ते संगितल्याचे राऊत म्हणाले.


शरद पवारांमध्ये पक्ष उभी करण्याची ताकद 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्या नावाभोवती फिरत आहे. जस शिवसेना हा पक्ष ठाकरे नावाभोवती फिरतो. त्यामुळं शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणं हा पक्षाला कमजोर करणारा निर्णय असल्याचे राऊत म्हणाले. त्यांच्या पक्षातील काही नेत्यांवर दबाव आणला जात आहे. अशात काही जण जातीलही सोडून. पण शरद पवार यांच्यामध्ये पक्ष उभी करण्याची ताकद असल्याचे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे असतानाही लोक सोडून गेले. यामध्ये छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील यांनी शिवसेना सोडली, पण पक्ष पुन्हा उभा राहिल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, माझं सकाळचं बोलणं थांबवण्यापेक्षा तुम्ही ईडी आणि सीबीआयचा वापर थांबवा असे राऊत म्हणाले.


राऊतांना अटक केल्यानंतर पक्ष बदलण्याची ऑफर


राऊत साहेबांना ज्यावेळी ईडीने अटक केली, त्यावेळी पक्ष बदलण्याच्या ऑफर आल्याचे आमदार सुनील राऊत म्हणाले. संजय राऊत यांचे सकाळी मीडियाशी बोलणे बंद करा. तुम्ही पक्षात या तुम्हाला दिल्लीला घेऊन जातो असे काही नेते म्हणाल्याचा खुलासा सुनील राऊत यांनी केला. आमचं घराण वडिलांपासून बाळासाहेबांचे भक्त होतं. आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत असे सुनिल राऊत म्हणाले. पुढे काय करायचे तर संजय राऊत ठरवतील असेही सुनिल राऊत यावेळी म्हणाले.