Arjun Khotkar : सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच गरम झालं आहे. एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी सेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केलं. हा शिवसेनाला मोठा धक्का होता. त्यानंतर 12 खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. आता आजी माजी आमदारही शिंदे गटात सामील होत आहेत. अशातच एका नेत्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ते नेते म्हणजे अर्जुन खोतकर (Arjun Khotkar). अर्जुन खोतकर हे कट्टर शिवसैनिक आहेत. मात्र, ते देखील शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरु आहे. काल त्यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे देखील उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा आज सकाळी दानवे आणि खोतकर यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तसेच अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची देखील सध्या चर्चा सुरु आहे. 


रावसाहेब दानवे हे माझी मेहबुबा


2019 मध्ये एका कार्यक्रमात अर्जुन खोतकर यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्याची सर्वत्र चर्चा झाली होती. रावसाहेब दानवे आणि मी गेल्या 30 वर्षाचे जोडीदार आहोत. रावसाहेब दानवे हे माझी मेहबुबा आहेत. मी त्यांच्यावर प्रेम करतो ते माझ्यावर इश्क करतात असे वक्तव्य खोतकरांनी केलं होतं. ही जोडगोळी गेली 30 वर्ष राज्याच्या विधानसभेपासून लोकसभेपर्यंत काम करत आहे.  



अर्जुन खोतकर रावसाहेब दानवेंना सरळ करणारी व्यक्ती : चंद्रकांत खैरे 


अर्जुन खोतकर कुठेही जाणार नाहीत. ते ईडीच्या कामासाठी दिल्लीला गेले होते. त्यांचे माझ्याशी बोलणे झाल्याचे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. अर्जुन खोतकर हे कटवड शिवसैनिक आहेत. त्यांचे नाव अर्जुन आहेत. उद्धव ठाकरे हे त्यांच्यासाठी श्रीकृष्ण आहेत असे खैरे म्हणाले. अर्जुन खोतकर ही  एकच अशी व्यक्ती आहे की जी रावसाहेब दानवे यांना सरळ करु शकते. एका निवडणुकीच्या काळात खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या तोंडात मारली होती अशी माहिती देखील चंद्रकांत खैरे यांनी दिली. 


 



2019 ला दानवेंना पराभूत करण्याचा खोतकरांनी केला होता निर्धार, पण...
 
जालन्यात भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचं वैर सर्वश्रुत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जालना लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा खोतकरांनी केली होती. युती झाली तरीही मी शंभर टक्के जालन्यातून लढणार आणि विजयीच होणार असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंविरोधात शड्डू ठोकला होता. जालन्यात दानवेंना पराभूत करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. मात्र, त्यानंतर पक्षाचा आदेश मान्य करत त्यांनी लोकसभेच्या मैदानातून माघार घेतली होती. 


शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये एक शीत युद्ध पाहायला मिळत होते. काही दिवसांपासून दोघेही जाहीर व्यासपीठावरुन एकमेकांविरोधात टीका करायची संधी सोडत नव्हते. आता याचाच प्रत्यय म्हणजे जालना शहरातील चौकाचौकात पाहायला मिळतोय. जूनमध्ये अर्जुन खोतकर यांचा वाढदिवस झाला. यावेळी वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर जालन्याचे फिक्स खासदार, भावी खासदार अशा प्रकारचा उल्लेख अर्जुन खोतकर यांच्या नावाआधी करण्यात आला होता. त्यामुळं दानवे विरुद्ध खोतकर असा सामना रंगला होता. मात्र, आता पुन्हा दानवे खोतकर यांची दिलजमाई झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोघांनीही ऐकमेकांना साखर भरवून सगळे मतभेद विसरुन पुढे काम करण्याचे ठरवले आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: