Maharashtra Rajya Sabha Election 2022 : संभाजीराजे छत्रपती यांनी (Sambhaji Raje Chhatrapati) पुढील निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी याबद्दलची घोषणा केली. भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीनं आपल्याला मदत करावी, अशी सादही त्यांनी घातली. मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी सांगितले की, आगामी राज्यसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष दुसरा उमेदवार उभा करणार आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते एकत्र बसून निवडणुकीची रणनीती ठरवणार असल्याचे परब यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेच्या या खेळीचा परिणाम संभाजीराजे छत्रपतींच्या भवितव्यावर होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महाविकास आघाडी निवडणुकीची रणनीती ठरवणार
मंत्री परब म्हणाले, महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार शिवसेनेच्या कोट्यातून असेल आणि त्या उमेदवाराची निवड कशी करायची याची रणनीती नेते ठरवतील. पण मला खात्री आहे की शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडला जाईल. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी 12 मे रोजी मोठी घोषणा केली. त्यांनी 'स्वराज्य' संघटनेची स्थापना केल्याची घोषणा केली. लवकरच ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले होते. तसेच सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. संभाजीराजे यापूर्वी भाजपशी संबंधित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांच्या उमेदवारीला त्यांचा पक्ष पाठिंबा देऊ शकतो, असे संकेत दिले होते, परंतु त्यांना मविआच्या इतर दोन घटकांची मते न मिळाल्यास त्यांची निवडणूक कठीण होऊ शकते. राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना 24 मे रोजी जारी होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 13 जून रोजी संपणार आहे.
'या' नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे
पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे आणि विकास महात्मे (तिघेही भारतीय जनता पक्ष), पी चिदंबरम (काँग्रेस), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी) आणि संजय राऊत (शिवसेना) या महाराष्ट्रातील सहा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपत आहे. आणि या चारही पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
ती मतं संभाजीराजेंना मिळणार का? शरद पवारांनी दिलं यावर उत्तर
संभाजीराजेंनी मांडलेल्या गणितावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं होतं. राज्यसभेचा उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी 41 मतं आवश्यक असतात. महाविकास आघाडीकडे 27 अतिरिक्त मतं आहेत. ती मतं संभाजीराजेंना मिळणार का, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवारांनी महाविकास आघाडीचं मतांचं गणित सांगितलं. राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज निवडून येईल. तितकी मतं पक्षाकडे आहेत. एक जण निवडून गेल्यावरही आमच्याकडे 10 मतं शिल्लक राहतात, असं पवार म्हणाले. शिवसेनेकडे गरजेपेक्षा अधिक मतं आहेत. त्यांचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाईल आणि त्यानंतरही काही मतं उरतील. सत्तेतील तिसरा पक्ष असलेल्या काँग्रेसकडेही अतिरिक्त मतं आहेत. त्यामुळे काही कमी-जास्त असेल तर आमचे लोक त्यांना मदत करतील, असं शरद पवारांनी सांगितलं.