Sambhaji Bhide : व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते. समाजात खाण्या पिण्यातुन अनेकांना विषबाधा होते. या भूत-विष बाधावर उपाय आहे. पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. या तिन्ही बाधा वरचा तोडगा कोणता? हे संभाजी भिडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले आहे.


या तिन्ही बाधा वरचा तोडगा कोणता? संभाजी भिडे म्हणतात...
मिरजेत शिवतीर्थ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या अनावरण प्रसंगी संभाजी भिडे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच बाधा, दुसरी आंग्ल बाधा, तिसरी गांधी बाधा.. या तिन्ही बाधावर तोडगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची उपासना आपण केली पाहिजे. असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. म्लेंच बाधा म्हणजे पाकिस्तान बांगलादेशच्या मुस्लिम समाजाच्या विचारांची बाधा, आंग्ल बाधा म्हणजे इंग्रज आपल्यावर स्वार झाले आणि त्यामुळे आलेली इंग्रजी विचारांची बाधा आणि शस्त्र विना स्वतंत्र मिळते हा विचार म्हणजे गांधी विचाराची बाधा. अशा तीन बाधा हिंदुस्थानला झाल्या असल्याचं संभाजी भिडे यांनी सांगितले.


123 कोटी जनतेचा रक्तगट बदलला पाहिजे
हा हिंदुस्थान चोरांच्या ताब्यात आहे. त्यांना नेस्तनाभूत करा. या देशावर भगव्याचे राज्य स्थापन करा. छत्रपती यांची जी अपेक्षा आहे. ते पूर्ण करण्याचे काम आपल्याला करावे लागेल. कोणतीही परकीय सत्ता असली तरी त्या चीनची पकड तोडून काढली पाहिजे. या देशाला ताकत देण्यासाठी हिंदुस्थानच्या सर्व समाजातील 123 कोटी जनतेचा रक्तगट बदलला पाहिजे. यांचा रक्तगट शिवाजी-संभाजी केला पाहिजे. यावेळी भिडेंनी उपस्थित लोकांना सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी राष्ट्रासाठी त्याग केला, राग मानू नका पण महाराजांच्या हृदयातील कण सुद्धा तुम्ही जाणत नाही. ते जाणले असते तर देशाचे चित्र आज वेगळे असते असेही भिडे म्हणाले.


भिडेंबाबत वेगवेगळे दावे सोशल मीडियावर 


संभाजी भिडे यांच्याबाबत वेगवेगळे दावे सोशल मीडियावर केले जातात. एकदा सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'अमेरिकेने भारतीय कालगणनेनुसार एकादशीला यान सोडल्याने ते यशस्वी झाले,' असं वक्तव्य केलं होतं. तर "संपूर्ण देशाला हिंदुत्वाच्या धारेखाली आणून नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची प्रतिमा छापायची आहे आणि या गोष्टी शिवसेनेच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकतात." असंही त्यांनी म्हटलं होतं.


कोण आहेत संभाजी भिडे?
संभाजी भिडे यांच्याबाबत माहिती अशी की, मनोहर असं मूळ नाव असलेले भिडे सांगलीत राहतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे आहेत. संभाजी भिडे 1980 च्या दशकात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त कार्यरत होते, संघाशी वाद झाल्यानंतर त्यांनी सांगलीमध्ये प्रतिसंघाची स्थापना केली होती. 1984 मध्ये संभाजी भिडे यांनी श्री शिव प्रतिष्ठानची स्थापना केली. बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी वाद उफाळला होता तेव्हा भिडे यांच्या 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' या संघटनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला होता.