मुंबई: शिवसेनेतून बंड करुन उद्धव ठाकरे सरकार पडण्यासाठी कारणीभूत ठरलेले बंडखोर आमदार आज मुंबईत परतले. त्याच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून मुंबई विमानतळ ते ताज प्रेसिडेंट या मार्गिकेवर मुंबई पोलिसांनी विशेष कॉरिडॉर तयार केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. या बंडखोर नेत्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. 


बंडखोर आमदारांना घेऊन विमान मुंबईत आल्यानंतर एबीपी माझाचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी त्या विमानातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांशी संवाद साधला. मुंबईत आल्यानंतर आम्ही सर्वजण आनंदी असल्याचं या बंडखोर आमदारांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 


या आमदारांना आणण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड हे विमानतळावर उपस्थित होते. या ठिकाणी शेकडोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आमदार ज्या मार्गाने जाणार आहेत त्या मार्गावर विशेष कॉरिडॉर निर्माण करण्यात आला आहे.तीन विशेष बसच्या माध्यमातून हे आमदार एयरपोर्टमधून बाहेर पडले. मुंबई पोलीस उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आणि पोलिसांना योग्य त्या सूचना केल्या. 


गोव्यातून बंडखोर आमदार मुंबईत येत असल्याने मुंबई पोलीस सतर्क असून सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलीस गिरगांव चौपाटीजवळ रस्त्यावर कोणतेही वाहन उभे करू देत नाहीत. कारच्या क्रमांकाच्या मदतीने ते मालकांशी संपर्क साधून त्यांना कार काढण्यास सांगत आहेत. या बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे सर्व कर्मचारी गस्त आणि राऊंडअपवर आहेत. त्यासाठी मुंबईत एअरपोर्ट ते ताज प्रेसिडेंट हॉटेलपर्यंत जागोजागी रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करत हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार पहिला सुरतमध्ये गेले, त्यानंतर ते आसाममध्ये गुवाहाटीला गेले. एकनाथ शिंदे मुंबईला आल्यानंतर त्यांचे समर्थक आमदार गोव्याच्या ताज कन्वेंशन सेंटर हॉटेलमध्ये राहिले. उद्या विधानसभा सभापतींची निवड आहे, तसेच सोमवारी एकनाथ शिंदे सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आमदार आज मुंबईत दाखल झाले. मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात येत आहे. 


उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवड
विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे  आगामी काळात अध्यक्ष महोदय असं कुणाला संबोधलं जाणार याचा निर्णय उद्या होणार आहे.  दरम्यान या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना  आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे.