Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. अशातच महत्वाची माहिती समोर येतेय. एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असून, बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंनी माहिती दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला उद्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. राज्यपालांकडून बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उद्याच्या बहुमत चाचणीत आमदारांची शिरगणती होणार आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. 


एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत 


राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चालला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार आसाममधील गुवाहाटी येथे वास्तव्याला आहेत. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडून बंडखोर आमदारांना वारंवार परत येण्याचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असून, बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंनी माहिती दिली आहे. 


शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला


शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. सूरतमध्ये आपल्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सूरतमधून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सगळे आमदार गुवाहाटीच्या दिशेनं रवाना झाले.  मग तिथून ते हे सगळे आमदार आसाममधल्या गुवाहाटीत पोहोचले.