Eknath shinde : रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अजय चौधरी यांची गटनेता म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हेच गटनेता असतील. विधिमंडळ सचिवालयानं एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.  त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 


शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तसेच सुनिल प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करुन भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, असं पत्र विधानमंडळ सचिवानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना पाठवले आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आजच शिवसेनेला आज मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले, हेच विधिमंडळाचे गटनेता आणि प्रतोत असतील असे विधानमंडळाने स्पष्ट केले आहे. या निर्णायामुळे शिवसेनेच्या कायदेशीर अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी शिवसेना कोर्टात जाऊ शकते. महाविकास आघाडीसोबत असलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, पक्षाने बजावलेल्या व्हिप न बजावल्यामुळे त्यांच्यावर विधिमंडळात कारवाई होण्याची शक्यता आहे.  


पत्रात काय म्हटले?
22 जून रोजी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र होते. यासंदर्भातील ठराव होता. या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला कळवण्यात येते की, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना दूर करुन अजय चौधरी यांची निवड करण्यात आली होती. याबाबत कायदेशीर तरतूदीपाहून अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांनी अजय चौधरी यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून रद्द करुन एकनाथ शिंदे यांची दिनांक 31 ऑक्टोबर 2019 रोजी गटनेते म्हणून करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्यात येत आहे. सुनिल प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करुन भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.