Maharashtra Political Crisis : सध्या राज्यात सुरु असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मी एक वारकरी म्हणून विठुरायाच्या दर्शनाला आलो असून यंदाच्या आषाढीची महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावी, असं साकडं विठ्ठलाला घातल्याचं भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितलं आहे. आज ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. 


जे शिवसेनेच्या आमदारांच्या बाबतीत झालं तेच शिवसेनेच्या खासदारांच्या बाबतीत घडेल सेनेचं 10 ते 12 खासदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून एकनाथ शिंदे यांच्या गटालाही शिवसेना म्हणून मान्यता मिळेल, असा विश्वास चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. 


येत्या दोन चार दिवसांत राज्यात सत्तांतर होईल, असं सांगताना एकनाथ शिंदे यांच्या मागे शिवसेनेचे 40 आणि पूर्वी भाजपाला पाठिंबा न दिलेले 10 असे 50 आमदार आहे. एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडले असून त्यांना सरकार बनविण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नसल्याचं चिखलीकर यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे याबाबत लवकरच निर्णय घेतील, असं सांगताना जे शिवसेना आमदारांच्या बाबतीत घडले तेच खासदारांच्या बाबतीत देखील घडलं असं सांगितलं. आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसल्याचं संपूर्ण महाराष्ट्र आणि जगाला कळून चुकलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम सध्या एकनाथ शिंदे करत आहेत. त्यामुळे शिवसेना म्हणून त्यांच्या गटालाच मान्यता मिळेल, असा विश्वास चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. 


यंदा विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान यंदा उद्धव ठाकरे यांना की नव्या मुख्यमंत्र्यांना?


पंढरपूरच्या शासकीय महापूजा कोण करणार? ठाकरे की फडणवीस यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहेत. मात्र, न्यायालयाच्या सुनावणीनंतर आमदार अमोल मिटकरींनी पहिली प्रतिक्रिया दिली होती की, ही शासकीय महापूजा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं करणार. 


सध्या राज्यात असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे यंदाच्या पंढरपूरच्या शासकीय पुजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का?  याची उत्सुकता लागली आहे. जर महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करता आले नाही तर राज्यात नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. नवे सरकार आले तर हा शासकीय महापूजेचा मान नव्या मुख्यमंत्र्याला मिळण्याची शक्यता आहे.  मात्र अवघ्या काही दिवसांवर आषाढी आली आहे. राज्यातील राजकीय घडामोडी ज्या वेगानं सुरू आहे, ते पाहता आता येणारा काळ ठरवेल की, पूजा होणार आहे की नाही? 


हेही वाचा: