CM Uddhav Thackrey : राज्यातील राजकीय घडामोडीला सध्या वेग आलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये राजकीय भूकंप झालाय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 35 पेक्षा जास्त आमदार आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संबोधन केले. उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थान सोडण्यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांना भेट दिली. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. बुधवारी सकाळी राज्यातील राजकीय घडामोडी वेगवान होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले होते. हाच धागा पकडून भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचा भंग करत लोकांची भेट घेतली अशी तक्रार तेजिंदर पाल सिंह यांनी दिली आहे. ऑनलाइन पद्धतीने मलबार हिल पोलिस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तेजिंदर पाल सिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.
तक्रारीत काय म्हटलेय?
तेजिंदर पाल सिंह यांनी उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याची ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमाचं उल्लंघन केलेय आहे. बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांमध्ये उद्धव ठाकरे यांना कोरोना झाल्याचे वृत्त झळकले होते. याला काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दुजोरा दिला होता. कोरोना नियमांनुसार, कोरोना रुग्णाला कुणालाही भेटता येत नाही. विलगीरणात राहावे लागते. पण मुख्यमंत्री सर्वांना भेटत असल्याचे बातम्यांमध्ये दिसले. उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियम मोडले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी विनंती करतो.
मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त सकाळी आले होते. मंत्रिमंडळ बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दिली. तसेच, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. एबीपी माझाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक क्विक अँटिजन टेस्ट करण्यात आली. याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, पण आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे संभ्रम आहे. त्यामुळे काही काळानं पुन्हा एकदा आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. त्यानंतरच मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत की, नाही याबाबत चित्र स्पष्ट होईल.
शरद पवारांनाही भेटले मुख्यमंत्री-
राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते. ही बैठक एक तासाहून अधिक काळ सुरु होती, पण त्यामध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समजलं नाही. यानंतर काँग्रेसचे नाना पटोले हेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. दरम्यान, मातोश्रीवर शिवसैनिक जमा होत होत असून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे.