मुंबई : कोरोनाचा नवा विषाणू असणाऱ्या ओमायक्रॉनचे (Omicron) रुग्ण जगभरात आढळत आहेत. भारतातही रुग्ण वाढत असून महाराष्ट्रात शनिवारी ओमायक्रॉनची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली. नव्या 416 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामधील सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबई महापालिका क्षेत्रात आढळली असून मुंबईमध्ये तब्बल 321 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.


मुंबईपाठोपाठ नागपूरात 62, पुण्यात 13, वर्ध्यात 12, अमरावतीत 6 आणि भंडारा, नाशिकमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 2759 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1225 रुग्ण कोरोना निगेटिव्ह आल्याने घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1009 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद ही मुंबई शहरात करण्यात आली आहे. तर त्या खालोखाल पुण्यात 1002 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 


राज्यात 46 हजार 393 नवे कोरोनाबाधित


मागील 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46 हजार 393 नव्या रुग्णांची भर पडली असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 30,795 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल राज्यात कोरोनाच्या  48 हजार 270 रुग्णांची नोंद झाली होती म्हणजे आज  कालच्या पेक्षा दीड हजाराने रुग्ण संख्या कमी झाली आहे.