रत्नागिरी :  घरोघर फिरणाऱ्या लाटेचा उत्साह आणि कोकण पर्यटनाची अनुभूती देणाऱ्या झोलाई-सोमजाई देवीच्या यात्रेची गुरूवार 21 एप्रिल रोजी सांगता झाली. या जत्रोत्सवाच्या निमित्ताने चैतन्य आणि उत्साहाची लाट संपुर्ण आंबवली-वरवली गावात पसरली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबवली गावामध्ये सहा दिवसांपासून यात्रेचा रम्य सोहळा सुरू होता. यात्रेच्या काळात पहिल्या तीन दिवसांमध्ये 22 फुट लांब लाकडी लाटेच्या खेळाने उपस्थितांची मने जिंकली आणि लाटेच्या दर्शनाने मुंबई, ठाणे, पुणे, इगतपुरीहून आलेल्या चाकरमान्यांच्याही डोळ्यांची पारणे फिटली आहेत. तर यात्रेच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये गावागावांच्या पालख्यांच्या उपस्थितीने झोलाईदेवी मंदिर उजळून निघाले होते.


मुंबई, ठाणे परिसरात राहणाऱ्या लाखो चाकरमान्यांचे श्रध्दास्थान असलेल्या ग्रामदेवता झोलाई-सोमजाईच्या यात्रेचा सोहळा तीन वर्षातून एकदा साजरा होतो. खेड तालुक्यातील आंबवली-वरवली गावाची जत्रा एप्रिल 2019 मध्ये झाली होती. त्यानंतर दोन वर्ष करोनाच्या संकटामुळे गावापासून दुरू राहिलेल्या चाकरमान्यांसाठी 2022 ची यात्रा हा गावाकडे परतण्याचे एकमेव मुख्य कारण ठरले आहे. हजारो चाकरमानी आंबवली वरवली मध्ये दाखल झाले होते. रविवार 17 एप्रिल रोज वरवली गावामध्ये लाकडी लाट तयार करण्यात आली होती.तेथून दोन दिवस आंबवली आणि वरवली गावामधील घराघरामध्ये लाटेचे स्वागत करण्यात आले. मोकळ्या जागेमध्ये लाटेचा खेळ पाहण्यासाठी असंख्य भाविक जमा होत होते. मंगळवारी मध्यरात्री लाट झोलाई देवीच्या मंदिरासमोरील सारावर (उंच चौथऱ्यावर) चढवण्यात आली. बुधवार मुख्य यात्रेचा दिवस असल्याने सर्व गावकऱ्यांनी या यात्रेत सहभागी झाले होते. सायंकाळी पालख्यांचा सोहळा आणि मनोरंजनात्मक लावणी कार्यक्रमाने यात्रेचा मुख्य दिवस साजरा झाला. तर गुरूवारी आंबवली-वरवली आणि महाळूंगे परिसरातील 18 गावांमधील पालख्यांचे एकाच ठिकाणी दर्शन घेण्याची संधी गावकऱ्यांना मिळाली. दुपारी झोलाई देवीच्या मंदिर परिसरातील लाट फिरवून या यात्रा सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमाला दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी हजेरील लावली होती.तर लावणी सम्राज्ञी सुरेशा पुणेकर यांच्या कार्यक्रमाने या कार्यक्रम अधिकच खुलून गेला होता.


डोळ्यांचे पारणे फिटले...


आंबवलीमध्ये यात्रेसाठी उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असून हजारोंचा जनसमुदाय पाहून डोळ्याचे पारणे फिटल्याची प्रतिक्रीया आमदार योगेश कदम यांनी दिली. तसेच या गावांच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


पर्यटकांना आकर्षित करणारा सोहळा...


आंबवली-वरवली गावातील वैशिष्ट्यपूर्ण यात्रा उत्सव महाराष्ट्रासह देशातील इतर भागातील भाविकांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या सोहळ्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचल्यामुळे भाविकांचा मोठा उत्साह यंदाच्या जत्रेला दिसून आला. पर्यटकांनाही भुरळ घालण्याची क्षमता या सोहळ्यात असून गावच्या विकासासाठीही यात्रा उत्सव महत्वाचे योगदान देत आहे, अशी प्रतिक्रीया ग्रामस्थ चंद्रशेखर यादव यांनी दिली.


शिस्तबद्ध नियोजन...


हजारोच्या संख्येने येणारा जनसमुदायाचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने आंबवली-वरवली ग्रामस्थ मंडळाच्यावतीने व्यापक प्रयत्न करण्यात आले. लाटेचा सोहळा, पालख्यांचे स्वागत, धार्मिक आणि पारंपारिक कार्यक्रम नियोजनबद्द पार पाडून गावकऱ्यांनी आणि चाकरमान्यांनीही शिस्तबद्धन यात्रोत्सवाची ओळख करून दिल्याची प्रतिक्रीया राजेश गुरूनाथ यादव यांनी व्यक्त केली.