Maharashtra Rains : राज्यात सामान्यांना एकीकडे कोरोनाच्या संकटाला सामोरं जावं लागत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट उभं ठाकलं आहे. आज पहाटे मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील पिकांचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मराठवाड्यासह विदर्भ आणि राज्यातील अन्य भागातही 18 ते 21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पावसासह गारपीट झाली आहे. तालुक्यातील हसनाबाद ,तळेगाव, सुरंगळी या भागात पहाटे 5 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली आहे. त्यामुळे या भागातील पिकांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जातोय. सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसामळे जागोजागी गारांचा खच पडल्याचं दिसून आलंय.
वाशिम जिल्ह्यातही विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे या भागातील फळबागासह रब्बी पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढगांच्या गडगडाटासह लातूर जिल्ह्यात अनेक भागात मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे या भागातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
सध्या राज्यातील विविध भागात शेतात ज्वारी, गहू , हरभरा, संत्रा, फळभाज्या अशी पीक आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला आले आहेत. वादळ, पावसामुळ या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये या वातावरणामुळे काळजी निर्माण झाली आहे. मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्यानंही गारपीट, पावसाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी गहू, हरभरासह इतर पिकांची कापणी करून घेण्याचे कृषी विभागाने आवाहन केलं आहे.
हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट करत हवामानाचा अंदाज व्यक्त केला होता. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
विदर्भातही अवकाळी पाऊस
नागपूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्री अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्री दहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पाऊस तब्बल एक तास हलक्या ते मध्यम स्वरूपात कोसळत राहिला. त्यामुळे उन्हाळ्याकडे वाटचाल करणाऱ्या पूर्व विदर्भात अचानक गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने आधीच 19 आणि 20 तारखेला नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाचा इशारा दिला होता. दरम्यान या पावसामुळे शेतीचा नुकसान होण्याची शक्यता आहे.
उद्या MPSCची परीक्षा देताय! ही खबरदारी नक्की घ्या, आयोगाकडून सूचना