मुंबई: जगातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक देश म्हणून भारताचा गौरव झाला त्याच देशावर आता दुग्धजन्य पदार्थ बाहेरून आयात करण्याची वेळ आली आहे. यापूर्वी सुद्धा 2011 मध्ये भारताने दुग्धजन्य पदार्थाची बाहेर देशातून आयात केली होती आणि आता पुन्हा दुधाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं (Sharad Pawar) केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरूषोत्तम रूपालांना पत्र लिहिले आहे. दुग्धजन्य पदार्थांची आयात न करण्याची विनंती केली आहे. भारतीय दूध उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होण्याची भीती पत्रातून व्यक्त केली आहे.
देशामध्ये दुधाच्या उपपदार्थाचे आयात केली जाऊ शकते अशी शक्यता वाटल्यानंतर केंद्रीय माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी यासंदर्भात देशाने पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे. एकीकडे मागच्या 15 महिन्यात दुधाच्या दरात तब्बल 12 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली असतानाही दुधाचे उत्पादन मात्र वाढत नाही म्हणून अखेर देशाला हा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुधाच्या उत्पादनात घट होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे लम्पी आहे. लम्पी आजारामुळे दुभत्या जनावरावर परिणाम झाला आहे.
सद्यस्थितीत देशाला दुधाची कमतरता जाणवत नसली तरी आगामी काळात मात्र दुग्धजन्य पदार्थाची कमतरता भासणार आहे. मागच्या वर्षभरात दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली नाही. लम्पी आजारामुळे देशभरातील जवळपास एक लाख 89 हजार जनावरांचा मृत्यू झाला. तर याच लम्पीमुळे मोठ्या प्रमाणात फक्त दुधाचे उत्पादन घटले नाही तर अनेक जनावरांची प्रजनन क्षमता देखील कमी झाली आहे.
देशातील दुधाची सद्यस्थिती
- मागच्या अनेक वर्षात पहिल्यांदा तब्बल सव्वा वर्षात 12 ते 15 टक्क्यांनी दुधाची भाववाढ झाली
- 2021 - 22 या वर्षात देशातील दूध उत्पादन 6.25 टक्क्यांनी वाढले
- 2021 22 या आर्थिक वर्षात 221 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन झाले.
- 2020 - 21 या वर्षात देशात दुधाचे उत्पादन 208 दशलक्ष टन झाले होते..
- 2022- 23 या आर्थिक वर्षात देशातील दूध उत्पादनात कोणतीही वाढ झालेली नाही..
एकीकडे लम्पी आजारांमुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर बहुतांश पशु पालकांनी लम्पी आजाराच्या भीतीने पशुधन विकले आहे. तर दुसरीकडे उन्हाळ्याच्या दिवसात दुधाचं उत्पादन वाढत नाही. त्यामुळे भविष्यात दुधाच्या उत्पादनामध्ये किती वाढ होते यावर सुद्धा बाहेर देशातून दुग्धजन्य पदार्थ आयात करायचे का हे अवलंबून असणार आहे
देशामध्ये दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याची ही काही पहिली वेळ आहे यापूर्वी 2011 मध्ये आपल्याकडे दुग्धजन्य पदार्थाची आयात करावी लागली होती आणि असेच परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवताना पाहायला मिळते आहे