पंढरपूर : विठ्ठल मंदिर आराखडा 73 कोटी , पंढरपूर विकास आराखडा 2700 कोटी .. या घोषणा करताना शिंदे- फडणवीस सरकार थकत नसले तरी किमान देशभरातून येणाऱ्या विठ्ठल भक्तांना काय हवे याचा तरी थोडा विचार करा असे म्हणायची वेळ आली आहे.  सध्या विठ्ठल भक्तांना या सरकारच्या काळात कोणी वालीच उरला नसल्याचे विठ्ठलभक्तांचे म्हणणे आहे.   


मंदिराचे व्यवस्थापन करणारी आणि भाविकांसाठी विकासकामे करणाऱ्या मंदिर समितीची मुदत संपून दोन वर्षे उलटून गेली आहेत. तरी शिंदे फडणवीस सरकारकडून या संदर्भात कोणताही निर्णय नाही.  मंदिराचे प्रशासन पाहणारा उपजिल्हाधिकारी दर्जाचा कार्यकारी अधिकारी मंदिराला हे सरकार देऊ शकले नाही. काही दिवसापूर्वी एका अधिकाऱ्याची ऑर्डर निघाली मात्र तो अधिकारीच रुजू होण्यासाठी आलाच नाही.  मंदिराचे काम पाहणाऱ्या व्यवस्थापकाची गेल्या सहा वर्षात बदलीच झाली नाही त्यामुळे मंदिराचा एकछत्री कारभार सुरु आहे. यामुळे विठ्ठलभक्त आणि मंदिर प्रशासन यांच्यातील संवाद संपला आहे. 


शिंदे - फडणवीस  यांनी मंदिर विकासाचा 73 कोटींचा आराखडा मंजूर केला पण तो राबवायला अधिकृत मंदिर समितीही नाही आणि अधिकारीही नाही.  त्यामुळे हा आराखड्याचे भवितव्य अंधारातच आहे दोन वर्षे संपूनही नवीन मंदिर समिती करण्यसाठी या सरकारला वेळ नाही. शासन ताब्यात असून विठ्ठलाच्या सेवेत एक अधिकारी नाही, सहा वर्षे एका जागेवर बसलेल्या व्यवस्थापकाची बदली करण्यासाठी या सरकारला वेळ नाही मग विठ्ठल भक्तांच्या मागण्या यांच्या सरकारपर्यंत पोहचणार कशा हाच प्रश्न आहे. 


किमान दर्शन रांग तरी छताखालून घ्या


विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या अबालवृद्ध भाविकांना तासंतास दर्शन रांगेत उभे राहावे लागते. उन्हाचे चटके, अनवाणी पायाने  रांगेत उभारणाऱ्या भाविकांना किमान पिण्याच्या पाण्याची तरी सोया करा असे भक्त सांगतात.  तर या लांबच लांब रांगेतून आमची सुटका करून सुलभ दर्शन व्यवस्था राबविण्याचे आवाहन अनेक भक्त करत आहेत. दर्शन रांगेत सुरु असलेली व्हीआयपींची घुसखोरी बंद करण्याची मागणी वारंवार भाविक करत असतात पण हे सर्व ऐकणारी ना समिती काही करते ना प्रशासन... शेगाववरून आलेला भाविक आपल्या मंदिरातील व्यवस्थेसारखी थोडीजरी व्यवस्था येथे केली तर भाविकांना आनंदात दर्शन घेता येईल असे सांगत होता. तर सात आठ किलोमीटर रांगेपर्यंत पोहचायचे आणि पुन्हा फिरून दर्शनासाठी रांगेतून परत यायचे हे वृद्ध भाविकांसाठी कष्टाचे आहे. किमान दर्शन रांग एका ठिकाणाहून आणि छताखालून घेतल्यास भाविकांना उन्हात मरणयातना भोगाव्या लागणार नाहीत असे काही भक्तांचे सांगणे आहे.


सरकारने मंदिराला चांगले व्यवस्थापन आणि प्रशासन तातडीने द्यावे  


 भाविकांना ना तुमचा 2700 कोटींचा आराखडा हवा आहे  ना 73 कोटींचा .. त्यांना विठुरायाचे सुखकर दर्शन हवे आहे.  ती देणारी व्यवस्था आधी द्या आणि मग या घोषणा करा हे भाविकांचे म्हणणे आहे.  शिंदे फडणवीस सरकारने तरी किमान ऐकावे अशी भाविकांची अपेक्षा आहे. त्यामुळे सध्या तरी या विठ्ठल भक्तांना विठ्ठलाशिवाय कोणी वाली उरला नसल्याने भाविकांचे म्हणणे आहे.  शिंदे फडणवीस सरकारने मंदिराला चांगले व्यवस्थापन आणि प्रशासन तातडीने द्यावे आणि या लाखो विठ्ठल भक्तांचे त्रास कमी करावेत एवढीच प्रार्थना हा विठ्ठलभक्त आपल्या देवाला करत आहे. 


हे ही वाचा :


कोट्यवधी रुपये मिळवणाऱ्या विठ्ठल मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्यावा, वारकरी संप्रदायाची मागणी