नांदेड : नांदेड जिल्हा कारागृहात मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या नऊ कैद्यांनी तुरुंगात उपोषण सुरु केले आहे. दुसऱ्या न्यायमूर्तींकडे केस वर्ग करा, या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील कुख्यात बिगानिया गँगने गेल्या पाच दिवसांपासून कारागृहातच अन्नत्याग आंदोलन  सुरु केले आहे. 


कैलास बिगाणिया, नितीन बिगाणिया, दिगंबर काकडे, गंगाधर भोकरे, सोमेश कट्टे, मुंजाजी धोंगडे, कृष्णा परदेशी, मयुरेश कक्ते आणि लक्ष्मण मोरे हे नऊ आरोपी विविध गुन्ह्यात मोक्का अंतर्गत नांदेड जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. आम्हाला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडून न्याय मिळण्याची आशा नाही. तसेच तुरुंग अधीक्षक सुभाष सोनवणे हे न्यायालयाची दिशाभूल करुन वारंवार आमची तक्रार न्यायालयाकडे करतात, असा आरोप कैद्यांकडून केला जात आहे. त्यामुळे जेल बदलीचा आदेश न्यायालयाकडे मागत असल्याचं कैद्यांच्या नातेवाईकांनी म्हटलं. परिणामी ही केस  दुसऱ्या न्यायमूर्तींकडे वर्ग करावी, यासाठी कैद्यांनी आंदोलन सुरु केले आहे.


तर जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असणाऱ्या कैलास बिगाणिया आणि गंगाधर भोकरे या दोन कैद्यांच्या पत्नीने संबंधित नऊ कैद्यांनी जिल्हा कारागृहात उपोषण सुरु केल्याच्या बातमीला दुजोरा दिला असून या विषयी नांदेडच्या मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयासोबत पत्रव्यवहार केल्याची माहिती दिली.


दरम्यान या उपोषणा विषयी जिल्हा कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसलेल्या या कैद्यांनी कालपासून मात्र पाणी घेणेही बंद केले आहे. तर नऊ कैदी 1 मार्च पासून पाणीही पिणार नसल्याचे पत्र कैद्यांच्या नातेवाईकांनी ABP माझा कडे सुपूर्द केले आहे. तर या उपोषणाचा विचार होऊन या कैद्यांची केस दुसऱ्या न्यायमूर्तींकडे वर्ग करावी अशी मागणी कुटुंबीय आणि वकिलांनी केली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha