वर्धा : मरणावस्थेत असलेल्या,आईपासून दुरावलेल्या अवघ्या सहा दिवसाच्या बिबट्याच्या पिल्लाला जीवनदान मिळाले आहे. तीन महिन्यांपूर्वी वाशिम वनविभागाला हा नर बिबट बछडा बेवारस स्थितीत आढळला होता. त्यानंतर तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर बछड्याचे त्याच्या आई सोबत पुनर्मिलन  व्हावे याकरता सात दिवस अथक प्रयत्नही केले मात्र सदर कार्यात यश न मिळाल्याने बछड्याला पुढील सांभाळ व देखरेखीसाठी वर्ध्यातील करुणाश्रमात दाखल करण्यात आले. 


सदर बछड्याची रक्त तपासणी व वैद्यकीय चाचणी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली असता तो दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे समजले.  त्यानंतर त्याच्या उपचाराला सुरुवात करण्यात आली व त्याप्रमाणे त्याचे डोळे जन्मापासून 16 दिवसांनी उघडले नसल्याने त्याला 'एन्ट्रोप्रीऑन ऑफ आईज' हा आजार असल्याचे निष्पन्न झाले. सदर बछड्याच्या डोळ्याच्या वरील पापण्या डोळ्यांच्या आतील भागात जन्मतःच गुंडाळून असल्याचे समजले. तीन महिन्याच्या अथक उपचारांनंतर यश प्राप्त झाले. 


सध्यस्थितीत बछडा सुदृढ अवस्थेत असून करुणाश्रमातील कर्मचारी त्याची काळजी घेत आहे. डॉ. संदीप जोगे यांच्या मार्गदर्शनात तसेच वन्यजीवप्रेमी कौस्तुभ गावंडे,आशिष गोस्वामी यांच्या नेतृत्वात सलग सात दिवसाच्या विशेष प्रयत्नाअंती या चिमुकल्या बिबट्याच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली. डॉ. संदीप जोगे यांनी त्याच्यावर उपचार केले. तर आता तो तंदुरुस्त झाला,सध्यस्थितीत बछडा सुदृढ अवस्थेत असून करुणाश्रमातील कर्मचारी त्याची काळजी घेत आहे. त्याची काळजी घेणारे वन्यजीवप्रेमी त्याला प्रेमाने 'जग्गू' असे संबोधतात.
 
"जग्गू" ला आनंदाने खेळताना बघून वन्यजीव प्रेमींना समाधान 


एक छोटासा बिबट्या ज्याला सृष्टी बघता येत नव्हती. त्याला करूणाश्रमात आश्रय देऊन त्याच्यावर योग्य उपचार,  काळजी घेऊन, आता तो 'एन्ट्रोप्रीऑन ऑफ आईज'  या आजारावर उपचार करून त्याला सृष्टी बघण्यास समर्थ  झाल्याने काळजी घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसून येते. करुणाश्रमात अनेक जखमी झालेल्या पक्षी व प्राण्यांना उपचार करून नवजीवन देण्यात आले आहे. त्यासाठी वन्य जीवप्रेमी आशिष गोस्वामी, कौस्तुभ गावंडे, यांच्यासह इतर सहकारी मोलाचे योगदान देत आहेत.