Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) पथकाने शुक्रवारी (3 मार्च) रोजी मोठी कारवाई करत, हातभट्टी दारुचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील पैठणच्या विहामांडवा परिसरात हा हातभट्टी दारुचा कारखाना सुरु होता. या कारवाईत एकाला अटक करत तब्बल 400 लिटर रसायनासह सहा लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. योगेश दारासिंग गवळी (वय 28 वर्षे, रा. विहामांडवा, ता. पैठण) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शहाजी शिंदे यांनी दिली आहे. 


दरम्यान याबाबत उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विहामांडवा येथील योगेश गवळीच्या घरात गावठी हातभट्टीसह बनावट देशी दारु तयार करण्यात येत असल्याची माहिती दुय्यम निरीक्षक शिवराज वाघमारे यांना माहिती मिळाली होती. त्यावरुन वाघमारे यांच्यासह सहायक दुय्यम निरीक्षक सुभाष गुंजाळे, जवान योगेश घुनावत, राहुल बनकर, अश्विनी बोदर व व्ही. जी. चव्हाण यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा मारला. यावेळी पथकाला गवळीच्या घरात 180 लिटरच्या 240 सीलबंद बाटल्या व तयार देशी दारुचे ब्लेंड, हातभट्टी दारु, दारु भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काचेच्या रिकाम्या बाटल्या, देशी दारु भिंगरी संत्राच्या बाटल्यावर लावण्यात येणारे जिवंत बुचे सापडले. त्याशिवाय हातभट्टी दारू तयार करण्यासाठी 400 लिटर रसायनासह इतर साहित्य मिळाले. 


गवळीचा साथीदार बीडहून मद्यार्क पाठवत होता 


या प्रकरणात गवळी याच्यासह त्याचा साथीदार नारायण घुमरे (रा. बीड) याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. तर गवळी यास बेड्या ठोकल्या असून, घुमरे फरार झाला आहे. तसेच गावठी दारु तयार करणाऱ्या आरोपी योगेश गवळीची परिसरात दहशत असल्याचे बोलले जात आले. तसेच, तो बनावट दारुची तस्करी करायचा. बनावट दारु तयार करण्यासाठी त्याचा साथीदार घुमरे हा बीडहून मद्यार्क पाठवत असल्याचे समोर आले आहे. तर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक शिवराज वाघमारे करत आहेत.


राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा धडका! 


गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडू जोरदार कारवाईचा धडाका पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनधिकृत मद्यविक्री विरोधात शुल्क विभागाकडून मोठ्याप्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. ज्यात सर्वाधिक कारवाई धाबे आणि हॉटेलमध्ये परवाना नसताना दारु विक्री करणाऱ्यांच्या विरोधात करण्यात आल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गांज्याविरोधात मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


G20 परिषदेसाठी लावलेल्या कुंड्यांची छत्रपती संभाजीनगरात चोरी, फोटो आले समोर