Chhatrapati Sambhaji Nagar News: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी आपल्या भारत राष्ट्र समिती पक्षाला (BRS) राष्ट्रीय पातळीवर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रापासून केली आहे. गेल्या काही दिवसांत मराठवाड्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. तर आणखी काही नेते पक्षाच्या संपर्कात आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) काही नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे या नेत्यांच्या येण्या-जाण्यासाठी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी खाजगी चार्टर्ड विमान (Charter Plane)  पाठवले होते. त्यामुळे चार्टर्ड विमानाने प्रवास करणाऱ्या या नेत्यांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.


यापूर्वी नांदेड आणि आता त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरावर बीआरएसचं लक्ष आहे. यासाठी आज (24 एप्रिल) शहरातील जाबिंदा मैदानावर भव्य अशी सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वी संभाजीनगरमधील अनेक महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. दरम्यान शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी देखील 19 एप्रिलला बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी काँग्रेस नेते फेरोज पटेल यांच्यासह अनेक नेत्यांची देखील उपस्थिती होती. परंतु जयाजी सूर्यवंशी यांना छत्रपती संभाजीनगरमधून तेलंगणाला जाण्यासाठी आणि इतर नेत्यांना तेलंगणाहून संभाजीनगरला परत येण्यासाठी विशेष खाजगी चार्टर्ड विमानाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे या पक्षप्रवेशाची सध्या जोरदार चर्चा आहे. 


अखेर शेतकरी नेता मिळालाच!


तेलंगणामधील सत्ताधारी पक्ष असलेल्या बीआरएसने आता महाराष्ट्रात देखील एन्ट्री केली आहे. पण सुरुवातीपासूनच के चंद्रशेखर राव यांच्याकडून महाराष्ट्रातील शेतकरी नेत्याची शोधाशोध सुरु होती. यासाठी त्यांनी राजू शेट्टी यांना देखील ऑफर दिली होती. पण राजू शेट्टी यांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर आता जयाजी सूर्यवंशी यांना पक्षात घेण्यास बीआरएसला यश आलं आहे. यापूर्वी जयाजी सूर्यवंशी यांनी केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनाची अनेकदा चर्चा झाली आहे. मराठवाड्यात शेतकरी समस्यांसाठी लढा देण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. पण पुणतांबा येथे झालेल्या शेतकरी संपात त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले होते. तेव्हापासून जयाजी सूर्यवंशी सक्रिय नसल्याचे पाहायला मिळाले. पण आता बीआरएस मध्ये प्रवेशानंतर ते पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे.


आज भव्य सभा...


बीआरएस पक्षाची आज छत्रपती संभाजीनगर शहरात सभा होत आहे. संध्याकाळी 6 वाजता या सभेला सुरुवात होणार असून, खुद्द तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव या सभेला उपस्थित राहणार आहे. दरम्यान यावेळी भव्य असा पक्ष प्रवेश सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. ज्यात 40 माजी नगरसेवक आणि माजी आमदार, खासदार यांचे प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे याच सभेतून मुख्यमंत्री केसीआर काही राजकीय घोषणा देखील करणार असल्याचे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


BRS Meeting : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 'बीआरएस'ची भव्य सभा; तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राजकीय घोषणा करणार