Maharashtra Political Crisis : कालपासून राज्याच्या राजकारणात सुरु असलेले राजकीय भूकंप काही थांबायला तयार नाही. तर काल रात्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाचा समोर येऊन माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पण याचवेळी बंड पुकारलेल्या शिवसेना आमदारांची भूमिका काय हे समोर आले नव्हते. मात्र पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदारांची बाजू समोर आली असून, औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. आमची नेतृत्वावर नाराजी नसून आमची राष्ट्रवादी-काँग्रेसवर नाराजी असल्याच शिरसाट म्हणाले आहे.
काय म्हणाले शिरसाट...
एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रिया देतांना शिरसाट म्हणाले की, आम्ही सोबतच असून, सर्वजण गुवाहाटी आलो आहोत. आमची बैठक झाल्यावर एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील. सद्या आम्ही शिवसनेचे 35 आणि अपक्ष 5 असे चाळीस आमदार सोबत आहोत. दुपारपर्यंत हा आकडा 46 च्या पुढे जाईल, त्यामुळे शिवसेनेचा आकडा 40 पर्यंत जाईल असं शिरसाट म्हणाले. तर आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर नाराजी असून नेतृत्वावर नारजी नाही. आता भाजपसोबत जायचं की आणखी काही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असेही शिरसाट म्हणाले.
अडीच वर्षे गप्प का?
राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर नाराजी असताना अडीच वर्षे गप्प का? यावर बोलताना शिरसाट म्हणाले, सत्ता स्थापन झाल्यावर कोरोनाचा काळ गेला,त्याचवेळी उद्धव ठाकरेंची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्या काळात निर्णय घेणे योग्य नव्हते असे शिरसाट म्हणाले.
आमदारांना मारहाण झाली का?
शिवसेना आमदार यांना मारहाण करून सोबत नेल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्याला उत्तर देतांना शिरसाट म्हणाले की, ते आमदार आहेत त्यांना कसे मारहाण केली जाऊ शकते. लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे त्यांना कोण का मारहाण करेल. संजय राऊत काय बोलतात त्यांना माहित असून, त्यांना कुठून माहिती मिळते काय माहित असेही शिरसाट म्हणाले.