OBC Reservation: राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुकींचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. एकीकडे राजकीय ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे ओबीसी  आरक्षणाशिवाय निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता या निवडणुकींना विरोध होतांना पाहायला मिळत आहे.  आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत  अशी भूमिका माजी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यानी मांडली आहे. 


सरकराने तातडीने कार्यवाही करावी: धनंजय मुंडे 


नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया देतांना धनंजय मुंडे म्हणाले की, ओबीसी आरक्षणा संदर्भात महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल तयार आहे. त्यामुळे राज्यातील 92 नगर परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी आमची ठाम भूमिका आहे. नवीन सरकारने तातडीने याबाबत कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणीही  धनंजय मुंडे यांनी केली.






सरकार कडून न्याय मिळेल: पंकजा मुंडे 


तर यावर प्रतिक्रिया देतांना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील अशी खंबीर पावलं उचलावी. त्यामुळे सरकार कडून न्याय मिळेल हा विश्वास असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. 






Maharashtra Elections 2022 : 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर


काँग्रेसचाही विरोध 


यावर प्रतिक्रिया देतांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ओबीसींचे गेलेले आरक्षण पुनर्स्थापित व्हावे यासाठी फडणवीस सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही. त्यांनतर प्रकरण न्यायालयात गेले आणि कोर्टाने इम्पिरिकल डाटा मागितला. पण केंद्र सरकारने हा डाटा देण्यास नकार दिला. केंद्रात बसलेल्या भाजपा सरकारने जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकारची अडवणूक केली. त्यांच्या याच भूमिकेमुळे ओबीसींवर अन्याय होत आहे. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये हीच भूमिका सुरूवातीपासून काँग्रेस पक्षाची असून, आजही आमची तीच भूमिका असणार असल्याचे पटोले म्हणाले.