Gram Panchayat Election: गावचं मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram Panchayat Election) घोषणा राज्याच्या निवडणूक आयोगाने (Election Commission) केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचातीच्या निवडणुका 18 डिसेंबरला पार पडणार आहे. तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 219 ग्रामपंचायतीच्या निवडणूक देखील 18 डिसेंबरला पार पडणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आत्तापासूनच इच्छुकांनी प्रचाराला सुरवात केली आहे. विशेष म्हणजे राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्याप्रमाणावर ग्रामपंचायत निवडणूका पार पडणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायती
अ.क्र. | तालुका | ग्रामपंचायत संख्या |
1 | औरंगाबाद | 35 |
2 | गंगापूर | 35 |
3 | खुलताबाद | 10 |
4 | पैठण | 22 |
5 | फुलंब्री | 18 |
6 | सिल्लोड | 18 |
7 | वैजापूर | 25 |
8 | कन्नड | 51 |
9 | सोयगाव | 05 |
अशी असणार निवडणूक प्रक्रिया
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. छाननी 5 डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी07.30 ते सायंकाळी 05.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तर मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.
थेट जनतेतून सरपंच...
यापूर्वी शिवसेना-भाजपचं सरकार असतांना राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर हा निर्णय रद्द करण्यात आला होता. पण आता पुन्हा एकदा भाजपचं सरकार आल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 18 डिसेंबर राज्यात पार पडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे.