Aurangabad Measles Disease Update: गोवर साथीचा मुंबईतील उद्रेक पाहता आता राज्यभरातील आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. दरम्यान औरंगाबाद शहरात देखील मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव (Measles Disease) पाहता आरोग्य विभागाकडून वेगवेगळ्या उपयोजना केल्या जात आहे. तर गोवरची साथ पसरू नये यासाठी औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. तर शहरातील 308 चिमुकल्यांनी अजूनही गोवर लस घेतली नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 


औरंगाबाद महानगरपालिकेने शहरातील वेगवेगळ्या वार्डात केलेल्या सर्वेक्षण गोवरची पहिली लस न घेतलेले 131 मुलं असून, दुसरी लस न घेतलेले 177 अशी एकूण 308 बालके आढळून आली. तर यातील 238 बालकांना गोवर लस देण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात गोवर साथीची लागण होऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात सर्वेक्षण केले जात आहे. गोवर रुबेला लस न घेतलेल्या बालकांचा शोध घेतला जात असल्याची माहिती देखील आरोग्य विभागाने दिली आहे. 


सर्वेक्षणाची आकडेवारी... 



  • लसीची पहिली मात्रा न घेतलेली 131 मुलं आढळून आली. 

  • त्यातील 96 बालकांना लसीचा पहिली डोस देण्यात आला. 

  • दुसरी लस न घेतलेले 177 मुलं आढळून आली. 

  • त्यातील 142  बालकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 

  • लस न घेतलेले एकूण 308 बालके आढळून आली.

  • यातील 238  बालकांना गोवर लस देण्यात आली. 


काय काळजी घ्याल...


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवर हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे त्याची लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात व बालरोग तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. विशेष म्हणजे आजाराच्या प्रतिबंधासाठी बालकास न चुकता गोवर रुबेला लसीच्या दोन मात्रा योग्य वेळेत द्याव्यात. सर्व मनपा आरोग्य केंद्रामध्ये, सर्व शासकीय रुग्णालये, घाटी, एमजीएम रुग्णालयात गोवर रुबेलाची लस व इतर लसी मोफत देण्यात येत आहे. तर बालकांना सर्दी, ताप, खोकला, डोळे लाल होणे, घशात दुखणे, अंगावर पुरळ येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आदी गोवरचे लक्षणे आहेत. 


प्रौढांमध्येही गोवरची लक्षणं 


गोवरचा प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये पाहायला मिळत असतानाच आता प्रौढांमध्येही गोवरची लक्षणं आढळून येत आहेत. कारण मुंबईत 18 आणि 22 वर्ष वयोगटातील दोघांची गोवरचे संशयित रुग्ण म्हणून नोंद करण्यात आल्याची माहिती  समोर आली आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये आदळून येणारा गोवर आता प्रौढांमध्येही पसरणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.