Maharashtra Political Crisis : विधानसभेत आज एकनाथ शिंदे सरकारनं बहुमताची परीक्षा पास केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुल्ल बॅटिंग केली. तर माजी मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासह शहाजी बापूंचं नाव घेत जोरदार टोलेबाजी केली. तर गेल्या आठ दिवसात काय घडले हे सांगताना भाजप आणि शिंदे गटावर सुद्धा निशाणा साधला.
काय म्हणाले अजित पवार...
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, नेहमी एवढ्या जोरात पट्टीचे बोलणारे आमचे अब्दुल सत्तार शांत आहे. एकदाच काय ते बोलले 'बिर्याणी खायलो जातोय' परंतु नंतर ती बिर्याणी पण काढली नाही बाबांनी..अजून मंत्रीमंडळाच सगळ काही निश्चित होईपर्यंत काहीच बोलायचं नाही अशी भूमिका अब्दुल सत्तार आणि बऱ्याच सहकाऱ्यांनी घेतली असल्याचा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.
मिरच्या झोंबल्या पाहिजेत...
सत्तार यांच्यावर टीकेचा बाणसोडल्यावर अजित पवारांनी मोर्चा माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे वळवला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, संदीपान जी मिरच्या झोंबल्या पाहिजे असे सांगतायत, काय तुमचं बोलावं आता मी, तुम्ही मंत्री होता आपण एकत्र काम केले. तुम्ही आपल्या कार्यकर्त्याला सांगता असे काही पाठव की, मिरच्या झोंबल्या पाहिजेत. अरे काय मीरच्या झोंबल्या पाहिजे, असे म्हणत अजित पवार यांनी भुमरे यांचे कान टोचले.
काय झाडी काय...
यावेळी अजित पवार यांनी शहाजी बापू यांच्याकडे सुद्धा घड्याळीचा काटा फिरवला. शहाजी बापू म्हणतात काय झाडी काय डोंगार काय हाटेल, ओक्के ओक्के. बापू आपण 95 ला एकत्र निवडून आलो. यात फार गोंधळून जायचं कारण नाही. ही मोठी लोकं एकत्र कधी येतील कळणारही नाही. तुम्ही मागे राहाल. बाकीचे म्हणतील आम्ही कधी तसं म्हटलं नव्हतो, असा खोचक टोला पवारांनी यावेळी लगावला. तर त्यांच्या या विधानांनी सभागृहात एकच हशा पिकला.
इतर महत्वाच्या बातम्या